नाशिक ग्रामीण

दोन देह, एकच ध्येय: दहावीच्या निकालात जुळ्या भावंडांची ‘यशस्वी’ कार्बन कॉपी!; जुळ्या भावंडांना दहावीत तंतोतंत सारखेच गुण!

देवळा / बाबा पवार
दहावीचा निकाल म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ नसते, तर तो पालकांच्या उत्कंठेचा परमोच्च बिंदू असतो. यंदाच्या निकालात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात एका विलक्षण योगायोगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. श्रीपुरवडे येथील रहिवासी आणि नामपूर येथील माध्यमिक शिक्षक तुषार पाटील यांची जुळी मुले प्रणीत आणि प्रणव यांनी केवळ दिसण्यातच नाही, तर बुद्धिमत्तेतही आपण एकमेकांचे प्रतिबिंब आहोत हे सिद्ध केले आहे. या दोघांनीही दहावीच्या परीक्षेत (SSC) तंतोतंत ९६ टक्के गुण मिळवून यशाचे अनोखे शिखर सर केले आहे.

विषयनिहाय गुणांतही कमालीचे साम्य
बागलाण एज्युकेशन संस्थेच्या बागलाण इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी असलेल्या या भावंडांचा निकाल पाहून शिक्षक आणि पालकही अवाक झाले. विशेष म्हणजे, केवळ एकूण टक्केवारीच नाही, तर हिंदी आणि गणित या विषयांतही दोघांना तंतोतंत समान गुण मिळाले आहेत. हा दुग्धशर्करा योग पाहून सर्वत्र आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे.

अतूट नात्याची ‘मार्कशीट’
आपल्या यशाबद्दल बोलताना प्रणीत आणि प्रणव म्हणाले, “आम्ही दोघे नेहमी एकत्रच अभ्यास करायचो. एकमेकांच्या शंका सोडवायचो, पण निकाल इतका तंतोतंत सारखा लागेल असे कधी वाटले नव्हते. हा निकाल म्हणजे आमच्यातील अतूट नात्याची आणि मैत्रीची पावती आहे.”

स्पर्धा नाही, तर सहकार्य
अनेकांना वाटते की जुळ्या भावंडांमध्ये गुणांची स्पर्धा असते, मात्र या दोघांच्या बाबतीत चित्र वेगळे होते. पालकांनीही त्यांच्यावर कधीही एकमेकांपेक्षा जास्त गुण मिळवण्याचे दडपण आणले नाही. “एकाला एखादा विषय कठीण वाटला, तर दुसरा तो सोपा करून सांगायचा. दोघांचे वेळापत्रक जवळपास सारखेच होते,” असे त्यांचे वडील तुषार पाटील व आई रोशनी पाटील यांनी अभिमानाने सांगितले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या ‘ट्विन्स’च्या यशाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. “दोन शरीरे पण एकच मेंदू,” अशा शब्दांत नेटकरी या जोडीचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्या या अनोख्या यशामुळे श्रीपुरवडे गावासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!