नाशिक ग्रामीण
व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित देवळा तालुक्यातील भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने दहावीच्या निकालात आपली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी बोर्डाच्या निकालात विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे.
विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
विद्यालयातून प्रियल संदीप साळुंके हिने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ऋषी रामराव बोरसे (९४.२० टक्के) द्वितीय, तर रिया दिपक सोनवणे (९३.०० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षेला बसलेल्या एकूण ८२ विद्यार्थ्यांपैकी ६९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले, तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. यशस्वी विद्यार्थ्यांना रामराव अहिरे शिक्षिका सीमा अहिरे, क्रांती सूर्यवंशी, सारिका चव्हाण, मोनाली जाधव, राहुल खंदारे, निलेश भालेराव आणि हेमंत शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणच नव्हे, तर जेईई (JEE), नीट (NEET), एमएचटी-सीईटी (MHT-CET) यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तज्ज्ञांच्या शिबिरांचे आयोजनही केले जाते.
संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे आणि प्राचार्य एन. के. वाघ यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक घडवणे, हेच संस्थेचे मुख्य ध्येय असल्याचे यावेळी प्राचार्य वाघ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.



