”आमच्या किडन्या घ्या, पण नदी वाचवा!” – गावकऱ्यांची प्रशासनाकडे आर्त हाक.
लोहणेरमध्ये वाळू लिलावाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; प्रशासन माघारी

देवळा : प्रशासनाला महसूलच हवा असेल तर आमच्या किडन्या विकून तो पैसा जमा करा, पण आमची जीवनवाहिनी असलेली नदी वाचवा. आमची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. वाळू उपसा झाल्यास पुढच्या पिढीला शेती करणे आणि पशुधन वाचवणे अशक्य होईल, वाळू ठिय्या चालू केला तर कुटुंबासह आणि पशुधनासह उपोषणाला बसण्याचा, तसेच प्रसंगी आत्मदहन करू अशी आक्रमक भूमिका गिरणा तीरावरील ग्रामस्थांनी घेतल्यानंतर महसूल प्रशासनाला पुन्हा एकदा रिकाम्या हाती परत जावे लागले.
तालुक्यातील लोहणेर येथील गिरणा नदीपात्रातील वाळू गट लिलावाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी संघटितपणे जोरदार विरोध दर्शवला आहे. वाढता जनक्षोभ आणि कायदा-सुव्यवस्थेची बिघडणारी स्थिती लक्षात घेता, प्रशासनाला अखेर ही प्रक्रिया तूर्तास स्थगित करून रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाजू मांडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आणि वाढता तणाव पाहता अधिकाऱ्यांना पंचनामा करून लिलाव प्रक्रिया स्थगित करत माघारी फिरावे लागले.
यावेळी दीपक महाजन, आण्णा पाटील, महेंद्र आहेर, कारभारी पवार, किरण निकम, रमेश आहिरे, माणिक निकम, समाधान महाजन, पी.डी.निकम राजेंद्र निकम, विलास निकम, बंटी शेवाळे, तानाजी निकम, ललित निकम, कमलेश आहेर, हेमंत पवार, उमेश सोनवणे, बापू बोरसे, जीभाऊ निकम, धर्मा भामरे, काशिनाथ पवार, योगेश पवार, समाधान गंगाधर, चेतन आहेर, नंदलाल जाधव, विठोबा सोनवणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांनी हा विरोध नोंदवण्यात आला आहे.



