नाशिक ग्रामीण
देवळा येथे विविध मागण्यांसाठी निवृत्तीवेतनधारकाचे उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय गोंधळामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन व इतर कामात नेहमीच दिरंगाई होत असून त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काहीही कार्यवाही होत नसल्याने देवळा तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने तालुकाध्यक्ष दिलीप आहेर व सरचिटणीस संजय ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
अंश राशीकरणाचे हप्ते संपून चार ते सहा महिने उलटूनही कपात थांबलेली नाही. अतिरिक्त कपात झालेली रक्कमही परत मिळालेली नाही. गट विमा प्रकरणे वेळेवर पाठवली जात नसल्याने काही प्रकरणे एक ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. ८०, ८५, ९० व ९५ वर्ष पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांना नियमानुसार पेन्शन वाढ मिळणे अपेक्षित असतानाही, अर्ज करूनही सहा महिने ते वर्षभर विलंब होत आहे. परिणामी, फरकाची रक्कमही मिळत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कामे मार्गी लागत नसल्याची तक्रार पेन्शनर्सनी केली आहे. तसेच एपी १५ रजिस्टर व पीपीओ नोंदी अपूर्ण असल्याने अनेक कामे रखडली आहेत. पेन्शन मंजुरी, फरक रक्कम, रिवाईज पेन्शन व काल्पनिक वेतनवाढ प्रकरणेही वेळेवर पूर्ण होत नसल्यामुळे सेवानिवृत्तांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पेन्शन विभागातील संबंधित कर्मचारी दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून दीर्घ रजेवर असून, प्रशासनाने अद्याप पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यामुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे. शिक्षण विभागाने सेवानिवृत्तांचे काम माहिती असणारा कर्मचारी दयावा यासह सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा न निघाल्याने देवळा तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपोषणास बसले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरनार, जिल्हा सरचिटणीस धनराज वाणी, राज्य नेते काळू बोरसे, केदु देशमाने, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, तालुका सरचिटणीस संजय ब्राम्हणकार, कि. वा. निकम, रा. पा. आहेर, भा. ता. अहिरे, अशोक वाघ, लता पगार, रेश्मा देवरे, सुमन आहेर, प्रमिला देवरे, मालती मेतकर, शिवाजी आहेर, गंगाधर भामरे, बापू पवार, पी. के. सोनवणे, अविनाश आहिरे, अशोक आहेर, डी. डी. पगार, तुळशीराम आढाव, बाजीराव जाधव, पी. पी. निकम, राजेंद्र जाधव, संजय देवरे, देवाजी निकम, दादाजी खैरनार, नथु अहिरे, विजय देवरे, केवळ वाघ, रमेश सोनवणे, दिनकर देवरे, लता निकम, शोभा वाघ, शकील तांबोळी, शिरीष पवार, बाळासाहेब मेधने, विजया जाधव, अनिता आहेर, गंगाधर निकम यांच्यासह सेवानिवृत्त वेतनधारक बहुसंख्येने उपस्थित होते.



