नैताळेतील श्री.मतोबा महाराज मुर्ती चोरी प्रकरणावर भाविकांचा संताप; पोलिस तपासाला गती द्या ; नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको ; पोलिस उपअधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ९ डिसेंबर २०२५ :- नैताळे ता.निफाड येथील प्रसिद्ध श्री मतोबा महाराज मंदिरातील दोन चांदीच्या मूर्तींची चोरी होऊन आठवडा उलटला तरी अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नसल्याने ग्रामस्थ व भाविकांचा संताप उसळला. याचा परिपाक म्हणून आज स्वयंस्फूर्तीने शेकडो ग्रामस्थ व भाविकांनी आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी एक तासापेक्षा जास्त काळ रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस उपअधिक्षक कांतीलाल पाटील यांनी तात्काळ तपासाला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांना निवेदन देत आंदोलन मागे घेतले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, दादा बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले. पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री मतोबा महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून ३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १ ते २ दरम्यान मंदिरातून तीन किलो वजनाच्या दोन चांदीच्या मुर्ती व दानपेटीची चोरी झाली. घटनेनंतर आठवडा उलटला तरी पोलिसांना चोरटे किंवा मुर्तींचा तपास लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. येत्या ३ जानेवारी २०२६ पासून १५ दिवसांचा यात्रोत्सव सुरू होणार असून महापूजा व रथोत्सवासाठी मूर्तींची आवश्यकता असताना तपास रखडल्याने असंतोष वाढत चालला आहे. या प्रकरणाची अद्याप जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीपराव बनकर यांनी देवस्थानाला भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना देऊनही अद्याप तपास नाही. त्यामुळे मूर्तींचा तातडीने तपास लावावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच निफाडचे पोलिस उपअधिक्षक कांतिलाल पाटील यांनी फौजफाट्यासह आंदोलनस्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तातडीने छडा लावला जाईल असे आश्वासन देत निवेदन स्विकारले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी परिसरातील शेकडो भाविक व ग्रामस्थ, मंडळ अधिकारी अश्विनी भोसले, तलाठी आईटवार, शंकर खडांगळे आदी उपस्थित होते.
—
भाविकांच्या भावना आम्ही समजतो. मूर्ती चोरी प्रकरणात अनेक पथके काम करत आहेत. लवकरात लवकर तपास लावून ग्रामस्थांना दिलासा देऊ.
कांतीलाल पाटील,
पोलिस उपअधिक्षक निफाड
—
श्री.मतोबा महाराज हे आमचे आराध्य दैवत व तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आमच्या भावना ओळखून पोलिसांनी तातडीने तपास गतीने करून मुर्ती शोधाव्यात; अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल.
केशव नाना बोरगुडे,
विश्वस्त, श्री.मतोबा महाराज देवस्थान



