हिंदू सरकारने च हिंदूंच्या भावनावर फिरवला बुलडोझर ; नाशिक जिल्ह्यातून संतापाचा उद्रेक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर घातला घाव ,,, !
वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक / सिन्नर , दि ; 23 जानेवारी 2026 –पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवला गेला नाही, तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बनवलेल्या वास्तूंवर स्वतःचं नाव लावून घेण्याचा किंवा कोरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही.
परंतु केलेली काम ही महान आणि तेजस्वी आहेत.
तीनशे वर्षानंतरही हा महाराष्ट्र-भारत देश बोलून उठेल अशी कामे महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशात बघायला मिळतात.
आणि म्हणूनच अहिल्यादेवी होळकर यांना मानणारा मोठा वर्ग त्यांना हिंदू धर्म रक्षक ही पदवी देतात,पुण्यश्लोक,राजमाता ही उपमा देतात.
अहिल्यादेवी होळकर यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड असणारी प्रतिमा दिसते.
अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वी पुढील हजारो वर्षांचे गणित लक्षात ठेवून बनवलेल्या वास्तू ह्या तोडून सध्याचे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारं सरकार हे अहिल्यादेवींचा विचार आणि हिंदु धर्मासाठी केलेले कार्य पुसण्याचा प्रयत्न करतय का…? हा प्रश्न आता अहिल्यादेवी प्रेमीं कडुन विचारला जात आहे,
कारण या अगोदर महाराष्ट्रामध्ये पंढरपूर कॉरिडॉर नावाखाली अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला घाट परिसर व श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर व अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी पंढरपूर येथील “होळकर वाडा” या सर्वांवर टांगती तलवार शासनाने लावण्याचे ठरवले होते.
तसेच नाशिकमधील पंचवटीतील अहिल्या घाट येथे विकासा च्या नावाखाली काहींनी प्रशासनाला हाताशी धरत हा घाट तोडण्याचा प्रयत्न केला.
काहींनी आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच कुंभमेळ्याच्या धर्तीवर स्वतःचे अस्तित्व तयार करण्याच्या उद्देशाने हा घाट तोडण्यात प्रयत्न केला होता.
परंतु आंदोलन उभे राहिले तेंव्हा कुठे स्थागित केले.
आत्ताच मागच्या काळामध्ये नांदूर मधमेश्वर,ता. निफाड, जि. नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगीचा वाडा पाडण्यात आला, आणि विशेष म्हणजे हा वाडा पाडण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नसताना तो वाडा पाडण्याचे दुष्कृत्य केलं,गावकऱ्यांचाही तो वाडा पाडून विकास करण्यास विरोध आहे.
आत्तापर्यंत होळकर वाडा हा सार्वजनिक होता व सार्वजनिकच असावा अशी गावकऱ्यांची सुद्धा मागणी असताना अशा पद्धतीने होळकर वाडा अचानकपणे पाडण्यात आला.
आणि आता सत्तेच्या दुरूपयोगाचा कळस म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील सर्वात महान तीर्थांपैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असणारे काशी येथील “माणिकर्णिका घाट” हा भव्य दिव्य, सुंदर असा घाट अचानकपणे चार तासात जेसीबी लावून तोडून टाकण्यात आला.
आणि विशेष म्हणजे या घाटावरती कुठल्याही प्रकारे देवी देवतांच्या मूर्तींची योग्य काळजी घेतली गेली नाही.
किंवा त्यांचा सन्मान राखण्यात आला नाही, ही गोष्ट अखंड हिंदुस्थानातील हिंदू धर्माच्या हृदयाला लागलेली आहे.
अशा परिस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांचा विचार पुसण्यासाठी हे हिंदुत्ववादी सरकार काम करतय का..? असा स्पष्ट सवाल अहिल्यादेवी प्रेमींकडून विचारला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार असलेला महा कुंभमेळा आणि त्या ठिकाणी होणार असणारी विकास कामे,
या सर्वांची पार्श्वभूमी लक्षात घेता आता नाशिकमध्ये पहिल्याप्रमाणे भीती वाटत आहे की,अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाबरोबरच अहिल्यादेवींनी तयार केलेले धार्मिक तीर्थक्षेत्र स्थळ यांचं परत जेसीबी लावून तोडकाम तर केल जाणार नाही ना..? याचबरोबर हिंदुत्वाचा सण म्हणजे कुंभमेळा अहिल्यादेवी होळकर यांनी प्रत्येक कुंभमेळ्याच्या जागी तत्कालीन परिस्थितीला साजेशी सुंदर रचना करून साधुसंतांना कुंभमेळा साजरा करण्यासाठी योग्य सोयी- सुविधा करून दिल्या, अन्नछत्र उभी केली,बारव बांधली, तलाव बांधले तसेच त्रंबकेश्वर येथील कुशावर्तासारखं महत्त्वाचे तीर्थ स्थळ अहिल्यादेवी होळकर यांनी बांधून दिले,
त्यामुळे हिंदू धर्माचे हे उत्सव अविरतपणे साजरे होत आहेत, त्या जागी हे सन साजरे होण्यासाठी कुठली अडचण आली नाही,
परंतु सध्याचे सरकार हे कुठल्याही धार्मिक रितीपरंपरा,धार्मिक मूर्ती, देवी-देवतांच्या मूर्ती, अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्ती यांचा मानसन्मान राखत नाही असे दिसून येत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तू तोडताना अगदी राजघराण्यातील वंशजांनाही विचारात घेतलं जात नाही.ही बाब खूप खेदाची आहे, त्याचबरोबर अविरतपणे आणि कुठलाही दूरदृष्टीकोन न ठेवता केला जाणारा हा नासका विकास आम्हाला नकोय.
त्या ऐवजी लोकांची मते विचारात घेऊन,समाजाच्या भावना लक्षात घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे विचार हे अविरतपणे पुढे चालू राहतील,
अशा पद्धतीने होणारा विकास आम्हाला मान्य आहे, असे मत नाशिक येथील होळकर प्रेमींनी मांडले आहे.
जर विकासच करायचा असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा विचार असावा हिंदुत्वाच्या पाऊलखुणा नष्ट करून स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे जर स्वतःला विकासशील म्हणत असतील तर आम्ही त्यांना “नासके विकासक” म्हणू यामध्ये आम्हाला कुठलाही खेद वाटणार नाही,
अशी स्पष्ट भूमिका नागरिकांच्या वतीने मांडण्यात येत आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या ठिकाणी होत असणारा विकास कामे हे जर योग्य प्रकारे नाशिक शहराला- नाशिककरांना साजेशी- नाशिकच्या ऐतिहासिक सांस्कृतिक जपणारी, अशा पद्धतीचे नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी दिलेला आहे त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षानेही त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे
आणि याच परिस्थितीमध्ये “ना भूतो न भविष्यती” अशा आंदोलनाला शासनाला सामोरे जावे लागेल,

प्रतिक्रिया = समाधान बागल
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतल्याने कोणतही सरकार हिंदुत्ववादी होत नाही तर ते त्यांच्या कर्मातून किंवा कामातून दिसायला हवे कारण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणार सरकार हे हिंदूंच्या धार्मिक अस्मितांचा नाश करताना दिसत आहे आणि भाषणांमधून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत आहे तर ही गोष्ट कुठल्याही प्रकारे योग्य नाही, अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती राम मंदिर व काशी विश्वनाथ मंदिरा बाहेर बसवल्या त्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत व त्यासाठी आम्ही मोदीजींना धन्यवाद देऊ परंतु अहिल्यादेवींच्या वास्तु व पाऊलखुणा जर तुम्ही तळागाळातून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तेवढ्याच प्रखरपणे आम्ही विरोधी करू हे विसरता कामा नये असे स्पष्ट मत समाधान बागल यांनी मांडले.
प्रतिक्रीया–
दत्तु बोडके–नाशिक.
खरंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर या स्वराज्याचा वारसा आणि हिंदू धर्म टिकवण्याचे काम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात केले आहे.
देशातील पडझड झालेले हजारो- लाखो मंदिरांचा जिर्णोद्धार करून नवीन मंदिरे निर्माण केली.
देशभरात बारव निर्माण केले आणि ज्या-ज्या ठिकाणी जसे- नाशिकचा कुंभमेळा असेल, देशभरात जिथे ही कुंभमेळा भरतो, जे धार्मिक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नागरिकांसाठी-भाविकांसाठी अद्यावत असे घाट तयार केले आहे.
या शासनाने विकास नक्की करावा परंतु अहिल्यादेवींचा वारसा जपत यांच्या विचारानुसार ज्या-ज्या ठिकाणी जे घाट आहे किंवा ज्या वास्तू आहेत त्या तशाच ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन नवीन काय करता येईल ते करावे अशी आमची शासनाकडून अपेक्षा आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वारसा व विचार हे शासनाने टिकून ठेवण्याचे काम आहे आणि तसे धोरण आखावे.
—- —– —- —- —-श्रीमंत अभिमन्यू राजे होळकर
काशीतील मणिकर्णिका घाटावर ‘विकास’ या नावाखाली मासाहेबांच्या मूर्तींचा झालेला नाश, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी, वेदनादायक, व संतापजनक आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व शासकीय व अशासकीय संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ कर्तव्यावरून दूर करण्यात यावे, तसेच दोषींना ठोस शिक्षा व्हावी. आम्ही विकासाच्या विरोधात नाही; मात्र विकासाच्या प्रक्रियेत ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन होणे अपेक्षित आहे, त्याचा विनाश नव्हे. होळकर कुटुंबाचा वंशज म्हणून असे बेजबाबदार व क्रूर पद्धती मी पूर्णपणे निषेध करतो. पुरातत्व विभागाने मूर्ती, शिल्पे व अन्य ऐतिहासिक संरचना सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.
— श्रीमंत अभिमन्युराव राजे होळकर





