भाजपमध्ये गटबाजी उफाळली; उमेदवारी वरून गंभीर आरोप
: वेगवान मराठी : मारूती जगधने
दि : १० जानेवारी २०२६
नांदगाव नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) तीव्र अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे तक्रार वजा निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून उमेदवारी प्रक्रियेत झालेला गोंधळ, युतीचा एकतर्फी निर्णय, पारदर्शकतेचा अभाव आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप निवेदनात समोर आले आहेत.
नांदगाव नगरपालिकेत एकूण १० प्रभाग असून २० नगरसेवकांची निवड होते, तसेच नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार होती. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत युती झाली होती. मात्र या युतीतून दिलेल्या दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घेतली, तर दुसऱ्याचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर, संबंधित दोन्ही उमेदवारांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, .भाजपकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची क्षमता असताना केवळ २ जागांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यात आली. हा निर्णय मंडळ अध्यक्ष संजय सानप आणि व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी कोणतीही बैठक न घेता, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप आहे. युतीची माहिती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोशल मीडिया व प्रिंट मीडियातून समजल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला.असे देखील निवेदनात म्हटले आहे .
ए.बी. फॉर्मवरून गंभीर आरोप
निवेदनातील सर्वात गंभीर आरोप हे उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या ए.बी. फॉर्म संदर्भात आहेत. चार फॉर्म उपलब्ध असतानाही अध्यक्षांनी फक्त दोघांनाच फॉर्म दिले, तर सतीश शिंदे आणि राजेंद्र गागुर्डे यांचे फॉर्म जाणीवपूर्वक लपवून त्यांचे अर्ज बाद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपक्ष किंवा इतर पक्षांतून निवडणूक लढवावी लागली, ज्याचा थेट फटका पक्षाला बसल्याचे नमूद करण्यात आले आहे .
गैरव्यवहार आणि ‘सेटिंग’चे आरोप
निवेदनात थेट गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले असून, उमेदवारांकडून ए.बी. फॉर्मसाठी पैशांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे ?. तसेच भविष्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही अशीच मागणी सुरू असल्याचा उल्लेख आहे.
याशिवाय, संजय सानप यांनी यापूर्वी लढवलेल्या विधानसभा, नगरपालिका आणि मार्केट कमिटी निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवारांशी ‘सेटिंग’ केल्याच्या चर्चांचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
पक्षांतर्गत संवादाचा अभाव :
निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या नंदकुमार खैरनार यांनी एकही बैठक न घेतल्याची तक्रार आहे. तसेच कार्यकारिणीत वारंवार बदल करूनही त्याची अधिकृत माहिती पक्षाला न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
निवेदनाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, ते भाजपचे काम सुरू ठेवतील, मात्र संजय सानप यांना मंडळ अध्यक्ष मानणार नाहीत, असे जाहीर केले आहे. तसेच संजय सानप आणि दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करून नवीन मंडळ अध्यक्षाची नियुक्ती करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे नांदगाव भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षश्रेष्ठी या तक्रारींची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवेदनावर प्रदीप थोरात जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र श आहेर जिल्हा सरचिटणीस, सतीश अहिरे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, नारायण मोरे तालुका सरचिटणीस, सतीश शिंदे नांदगाव मंडळ सरचिटणीस ,राजेंद्र गांगुर्डे एनसीसी मोर्चा तालुका माजी अध्यक्ष ,एडवोकेट उमेश कुमार सरोदे पंचायतराज उपजिल्हाप्रमुख , सौ .तारा शर्मा तालुका उपाध्यक्ष,भाऊसाहेब पगारे: कल्याण इनामदार:प्रशांत इनामदार:हिरालाल सानप: गोपाळ सानप: तेजस सानप:ज्ञानेश्वर ईश्वर सोळंके:विवेक दौंड: दत्तू वाघ:सुवर्णसिंग धर्मसिंग: ज्ञानेश्वर आहेर: हेमंत त्रिभुवन आहेआदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या संदर्भातला निवेदन नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच पक्ष संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आलेले आहे आणि या पत्राची प्रसिद्धी देखील देण्यात आली आहे .
प्रतिक्रिया :
पक्ष आदेशानुसार युती करण्यात आली होती त्यामुळे कुणाला विश्वासात न घेतल्याने राग येण्याचं कारण नाही उमेदवारी न मिळाल्याने वाईट वाटणं साहजिक आहे परंतु पक्ष्याचे नुकसान होईल असे वर्तन करू नये पक्ष्याचे हित ज्यामध्ये आहे तसे निर्णय घ्यायचे असतात सह्या करणारे पैकी बरेच युती करताना हजर होते काहींनी पक्ष विरोधी काम केले ,काहींनी पक्ष्याचे असून काम केले नाही जे प्रामाणिक एकनिष्ठ होते त्यांनी पक्ष आदेश मानत कार्य केले त्यांचे कौतुक
: – संजय सानप भाजपा मंडल अध्यक्ष नांदगांव तालुका
प्रतिक्रिया :- शिवसेनेची युती करताना वरिष्ठांच्या संमतीने वरिष्ठांच्या विचाराने आणि सर्वांच्या संमतीने हे झाले आहे युती करते समय
भाजपाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते त्यापैकी काहींच्या निवेदनावर सहया देखील आहे त्यानंतर निवडणूक प्रसंगी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी महायुतीचे वगळता इतर पक्षाचे प्रचाराचे काम केले तो विचार केला जावा पक्षविरोधी कारवाई कोणी केल्या हे देखील तपासले पाहिजे .शिवसेना भाजपा महायुती ही वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत संयुक्त निवेदन प्रकाशित करून करण्यात आलेले आहे त्यावर उपस्थित शहर पदाधिकाऱ्यांच्या सह्या देखील आहे
: दत्तराज छाजेड जिल्हाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी .



