नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव रन : आरोग्य, एकता आणि युवा शक्तीचा जागर

Nandgaon News

नांदगाव रन : आरोग्य, एकता आणि युवा शक्तीचा जागर
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 11 जानेवारी 2026
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेली नांदगाव रन ही केवळ एक धावण्याची स्पर्धा नव्हे, तर ती आरोग्य, एकता आणि सामाजिक जाणीवेचा प्रेरणादायी जागर ठरली. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढत चाललेले आजार, मोबाईल व तंत्रज्ञानामुळे कमी होत चाललेली शारीरिक हालचाल आणि युवकांमध्ये वाढणारी आळसाची भावना पाहता, अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.
सुमारे ३५० हून अधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. लहान मुलांपासून ते युवक, महिला आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता नांदगावकरांचा आरोग्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला. “धाव एकतेसाठी, एकात्मतेसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक एकोप्याची भावना. जाती, धर्म, पक्ष, वर्गभेद न ठेवता सर्वजण एका ध्येयासाठी धावताना दिसले. अशा कार्यक्रमांतून समाजातील सलोखा मजबूत होतो आणि ‘एक शहर, एक विचार’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारते.
युवा फाउंडेशनसारख्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम यशस्वी करून दाखवला, ही कौतुकास्पद बाब आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष, पोलीस प्रशासन व मान्यवरांनी दिलेले सहकार्य हे प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरले.
नांदगाव रन ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता, भविष्यात वार्षिक उपक्रम म्हणून अधिक व्यापक स्वरूपात राबवली जावी. शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग वाढवून ही चळवळ आरोग्य संस्कृतीची चळवळ बनावी, हीच अपेक्षा.
निरोगी नागरिक म्हणजे सक्षम समाज आणि सक्षम समाज म्हणजे प्रगत राष्ट्र. नांदगाव रनने हीच दिशा दाखवली असून, अशा उपक्रमांतूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश सफल होतो.
एकता, एकात्मता तसेच सदृढ व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नांदगाव रन स्पर्धेला नांदगावकर व शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव शहराच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे ३५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
ही स्पर्धा ११ जानेवारी रोजी पार पडली. नांदगाव येथील म.वि.प्र. महाविद्यालयाजवळील मनमाड रोड येथून स्पर्धेला सुरुवात होऊन याच ठिकाणी स्पर्धेचा समारोप करण्यात आला. पुरुष व महिला गटात वेगवेगळ्या अंतराच्या शर्यती घेण्यात आल्या.
स्पर्धेतील विजेते
पुरुष गट (०५ किमी):
प्रथम बक्षीस : रविंद्र दयाराम चव्हाण (पिंप्री हवेली)
द्वितीय : शशिकांत भगवान गोटे
तृतीय : कुणाल कैलास जूनधारे
महिला गट (०३ किमी):
प्रथम : कु. तपस्या अहिरे
द्वितीय : कु. कल्याणी दुरडे
तृतीय : योगिता हाटकर
याशिवाय उत्तेजनार्थ ६ बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत चिमुकल्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.
सन्मान व बक्षीस वितरण
विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेसाठी नांदगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष. सागर हिरे हे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून
उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव . दर्शन दुग्गड
. विष्णू निकम क्रिडा पट्टू,
पोलीस निरीक्षक – . दिगंबर भदाणे
आंतरराष्ट्रीय धावपटू, मालेगाव – भिकू
यांच्या हस्ते फ्लॅग व फुगे हवेत सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली तसेच बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आयोजनात युवा फाउंडेशनचे योगदान
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा फाऊंडेशनचे
केतन करवा, अंकुश सुराणा, संदीप पाटील, सुमित सोनवणे, सुमित गायकवाड, प्रसाद वडनेरे, मयूर दाभाडे, सिद्धेश सोनवणे, सुरेश देसले, ओम ठाकूर, निलेश पाटील, गोलू बोरसे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नांदगाव रन स्पर्धेमुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, पुढील काळात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याप्रसंगी नांदगाव या स्पर्धेसाठी डॉक्टर  ,पत्रकार, आजी माजी नगरसेवक, शालेय विद्यार्थी ,कॉलेज विद्यार्थी ,नांदगाव शहरातील व्यापारी व नागरिक ,श्रीराम नगर भागातील नागरिक , मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची स्पर्धा श्रीराम नगर ते फुलेनगर पर्यंतच्या मार्गावर घेण्यात आली स्पर्धा विना अडथळे संपन्न झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!