नाशिक ग्रामीणलोकल बातम्या
पत्रकार : लोकशाहीचा सजग प्रहरी : म वि प्र संचालक अमीत पाटील
NAN DGAON NEWS

पत्रकार : लोकशाहीचा सजग प्रहरी : म वि प्र संचालक अमीत पाटील
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि . 9 जानेवारी 2025
लोकशाहीची इमारत चार स्तंभांवर उभी आहे, असे म्हटले जाते आणि त्यातील चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. केवळ बातम्या देणे हेच पत्रकाराचे काम नाही, तर समाजातील सत्य, अन्याय, प्रश्न आणि परिवर्तनाची गरज लोकांसमोर निर्भयपणे मांडणे ही पत्रकाराची खरी जबाबदारी आहे. महाभारतातील संजय असो वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बहरजी नाईक — या सर्वांनी आपल्या काळात माहिती पोहोचवण्याचे, सत्य सांगण्याचे काम केले. त्यामुळे पत्रकारिता ही आधुनिक काळापुरती मर्यादित नसून ती परंपरागत सामाजिक गरज आहे.
आजच्या काळात पत्रकार अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत. आर्थिक दबाव, राजकीय हस्तक्षेप, सोशल मीडियावरील अफवांचे जाळे आणि वेगाच्या स्पर्धेत सत्य हरवण्याची भीती — या सगळ्यातून मार्ग काढत पत्रकारांना काम करावे लागत आहे. तरीही समाजातील चांगले-वाईट दोन्ही पैलू निर्भीडपणे मांडण्याचे धाडस पत्रकार करत आहेत, हे नाकारता येणार नाही.
लोकप्रतिनिधींना जनतेसमोर आणणे, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे आणि गरज पडल्यास जाब विचारणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. त्यामुळेच पत्रकार लोकप्रतिनिधींना घडवतोही आणि वेळ आली तर आरसाही दाखवतो. यामुळेच पत्रकारितेची भूमिका अनेकांना अस्वस्थ करणारी ठरते; पण लोकशाहीसाठी ही अस्वस्थता आवश्यक आहे. असे प्रतिपादन म वि प्र संचालक अमीत पाटील यांनी व्यक्त के ले ते नांदगाव येथील न्यु इंग्लीस स्कुलं येथील पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलत होतेः ते पुढे म्हणाले
नांदगाव येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यासारखे उपक्रम केवळ गौरवापुरते मर्यादित नसून ते पत्रकारांच्या जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करणारे असतात. सन्मान हा प्रेरणादायी असतो, पण त्याचबरोबर तो जबाबदारीची आठवणही करून देतो. पत्रकारिता हा व्यवसाय नसून व्रत आहे, ही भावना जिवंत ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे.
भविष्यातील पत्रकारांनी अभ्यासू, निर्भय, नीतिमूल्यांशी प्रामाणिक आणि समाजाभिमुख असणे आवश्यक आहे. कारण सक्षम पत्रकारितेशिवाय सक्षम लोकशाही शक्य नाही. पत्रकार सजग असेल, तरच समाज जागा राहील — आणि समाज जागा असेल, तरच लोकशाही टिकेल. असे पाटील यांनी व्यक्त के ले
. यावेळी पाटील यांचे हस्ते सुमारे ३० पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. नांदगावच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारांचा सन्मान करण्यात आल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संगीतशिक्षिका कल्पना अहिरे यांनी संगीतसाथ दिली. यावेळी माता सरस्वती व मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मंचावर इंजि. अमित भाऊ बोरसे–पाटील, विजय काकळीज, प्रभाकर कवडे यांच्यासह पत्रकार संजीव निकम, मारुती जगधने, सुरेश शेळके, राजेंद्र तळेकर, सुरेश नारायणे, महेंद्र पगार, बाबासाहेब बोरसे, बाबासाहेब कदम, अरुण हिंगमिरे, प्रमित आहेर, सचिन बैरागी, किरण काळे, सिताराम पिंगळे, महेश पेवाल, सुहास पुणतांबेकर, राजेंद्र जाधव, चंद्रकांत भालेराव, भगवान हिरे, विजय बडोदे, बापू जाधव, नाना अहिरे, अनिल धामणे, किरण भालेकर, विजय भावसार आदी उपस्थित होते.
उपशिक्षक दत्तात्रय भिलोरे यांनी पत्रकारांच्या कार्याचे विश्लेषण केले. विजय काकळीज यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी, “पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ते एक व्रत आहे. पत्रकारितेत येणाऱ्या तरुणांनी अभ्यासू व निर्भय असावे,” असे मत व्यक्त केले. प्रा. सुरेश नारायणे यांनी विद्यालयाविषयी ऋणनिर्देश व्यक्त केले.
कार्यक्रमात संस्थेच्या ‘विद्यार्थी सुरक्षा–कल्याण निधी’ उपक्रमांतर्गत युवराज खैरनार, ऋतुजा मदने व शुभम खताळ या विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, मुख्याध्यापक अविनाश साळुंके आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर पगार यांनी मानले.



