नाशिक ग्रामीण

विंचूर येथे कांदा प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद :- कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नाशिक – संभाजीनगर महामार्गावर, विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कांदा उत्पादनासाठी प्रतिक्विंटल सुमारे अडीच हजार रुपये खर्च येत असताना सध्या कांदा केवळ ७०० ते ८०० रुपये दराने विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लाल कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास लोकप्रतिनिधींना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिला.
केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला असून शेतकरी पुत्र म्हणून निवडून आलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवाल सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा घुमरे यांनी उपस्थित केला. रात्रंदिवस कष्ट करूनही कांदा उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असल्याचे सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही बाजार समित्या चार-पाच दिवस बंद असल्याने बाजार सुरू झाल्यावर कांद्याची मोठी आवक होऊन दर आणखी घसरण्याची भीती असल्याचे येवला तालुकाध्यक्ष विलास दरगुडे यांनी नमूद केले. शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनासाठी निफाड तालुकाध्यक्ष गजानन आबा घोटेकर, मच्छिंद्र जाधव, संदीप घोटेकर, बाळासाहेब गीते, दत्तू गायकवाड यांनी परिश्रम घेतले. ठोकळवाडीचे सरपंच चंदू भाऊ व विंचूरचे सरपंच सचिन दरेकर उपस्थित होते. आंदोलनाचे निवेदन उपनिरीक्षक किरण साळुंखे यांनी स्वीकारले.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!