“स्मशान घाट आंदोलना” ची दखल घेत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
उमराणे प्रेस क्लब व पंचक्रोशीतील नागरिकांची अनोख आंदोलन

“स्मशान घाट आंदोलना” ची दखल घेत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
मनोज वैद्य/ देवळा
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राहुड घाटात सतत होणारे अपघात थांबावे यासाठी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी प्रेस क्लब उमराणा व पंचक्रोशीतील नागरिकांनी छेडलेल्या “स्मशान घाट आंदोलना” ची महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन घटनास्थळी येत अपघात रोखण्यासाठी येत्या पंधरा दिवसात तातडीच्या उपाययोजना केल्या जातील तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रकल्प अहवाल (DPR) चे काम युद्धपातळीवर सुरु असुन सदर अहवालाचा प्रस्ताव राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. तो प्रस्ताव मंजूर होताच घाटातील नविन रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या पंधरा वर्षांपुर्वी सोमा कंपनीतर्फे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ चे चौपदरीकरण करण्यात आले. हे चौपदरीकरण होताना चांदवड तसेच देवळा तालुक्याच्या हद्दीतील राहुड घाटाचेही चौपदरीकरण करण्यात आले होते. मात्र हा रस्ता बनवताना घाटाच्या पायथ्याजवळ तिव्र उतार व वळण देण्यात आल्याने बहुतांशी वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटुन तसेच ब्रेक फेल होऊन या ठिकाणी वारंवार अपघात होतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या वळणावर गॅसचा टॅंकर उलटल्याने भिषण अपघात झाला होता.

या ठिकाणी वारंवार अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. यापुढील काळात अपघात होऊन जिवीत हानी होऊ नये यासाठी राहुड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तिव्र वळणावर सरळ रस्ता करण्यात यावा तसेच राहुड घाटापासुन अवघ्या दोन कि.मी.अंतरावर असलेल्या चिंचवे गावाजवळही वारंवार अपघात होत असल्याने तेथेही रस्ता रुंदीकरण करून उड्डाणपूल करण्यात यावा तसेच रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्यात यावेत अशा विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी प्रेस क्लब उमराणे, चिंचवे, सांगवी, उमराणे, तिसगाव, कुंभार्डे, गिरणारे आदी गावांतील ग्रामस्थांच्या वतीने शनिवार (दि.४) रोजी सकाळी १० वाजता राहूड घाटाजवळील हनुमान मंदिराजवळ प्रतिकात्मक ‘स्मशानघाट’ उभारुन लक्षवेधी उपोषण छेडण्यात होते.
तत्पूर्वी चिंचवेचे माजी उपसरपंच नानाजी मोरे यांच्या हस्ते हनुमान मुर्तीला श्रीफळ वाढवून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीकांत ढमे, समद सय्यद, महेंद्र सुर्यवंशी यांनी उपोषणस्थळी येत उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजुन घेतल्या. सदर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणात बाळासाहेब देवरे, नंदन देवरे, विनोद पाटणी, भगवान देवरे, शरद पवार, योगेश पवार, सतिश पवार, संदीप देवरे, रिंकू पवार, चिंचवेच्या सरपंच वैशाली पवार, उमराणे बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ, राजेंद्र जाधव, संदीप देवरे, शरद पवार आदिंसह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला.
दरम्यान उपोषणस्थळी सकाळपासूनच देवळा तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार कैलास निकम, सर्कल गजानन डोके तसेच देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील, चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



