सुसंस्कृत राजकारणाला काळीमा .. लज्जास्पद व अशोभनीय,माजी आमदार दिपिका चव्हाण यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची हकालपट्टीची करा
माजी आमदार दीपिका चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जयंत पाटील यांच्यावरची टीका ‘लज्जास्पद व अशोभनीय’
—
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.१९सप्टेंबर २०२५ : राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासला आहे. सभ्यतेच्या चौकटीला तिलांजली देणारे विधान करणाऱ्या भाजप आमदार पडळकर यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी संतप्त मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात माजी आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. जयंत पाटील यांच्यावरील पडळकरांची टीका केवळ एका नेत्यावरची व्यक्तिगत टीका नसून ती महाराष्ट्राच्या पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेवरच आघात असल्याचा ठपका चव्हाण यांनी पत्राद्वारे ठेवला आहे. या पत्रात त्या म्हणतात की, राजकारणात मतभेद असू शकतात, विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात; पण त्या मांडताना सभ्यता आणि संयम ही किमान पातळी राखलीच पाहिजे. पडळकर यांच्या वक्तव्यातून मात्र बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडते. जयंत पाटील यांचे वडील स्व. राजारामबापू पाटील यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यामुळेच त्यांना लोकनेते म्हणून जनमानसात स्थान मिळाले. त्या परंपरेचा गौरव वाढविण्याऐवजी, पडळकर यांनी पाटील कुटुंबाच्या मातोश्रींवर केलेली अवमानकारक टीका लज्जास्पद आहे.
आजवर महाराष्ट्रात भिन्न विचारसरणीचे नेते परस्परविरोधी भूमिकेत राहूनही सभ्यतेची संस्कृती टिकवून ठेवत आले आहेत. पण भाजपमधील काही नेते ही संस्कृती खालावत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. आमदार पडळकर यांनी केलेली विधाने केवळ जयंत पाटील यांच्यावर आघात करत नाहीत, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला तिलांजली देणारी आहेत. अशा वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणावर डाग लागतो. त्यामुळे यावर कठोर कारवाई करून उदाहरण घालणे अपरिहार्य आहे. पडळकर यांच्या वक्तव्यावर कारवाई झाली नाही, तर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटेल आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का देणारे वक्तव्य थांबवणे कठीण होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची हकालपट्टीसह कठोर कारवाई करावी, अशी मागणीही माजी आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.



