या शहरातील वाहतूक कोंडी प्रश्नावर रिपाई आठवले गटाचा अधिकाऱ्यास घेराव
वेगवान मराठी : मारूती जगधने
मनमाड : दि 8 सप्टेंब 22025
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर–पुणे महामार्गावर अवजड वाहनांच्या प्रचंड रहदारीमुळे दिवसेंदिवस तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून कौळाणे–निमगाव मार्गे नांदगाव, येवला व कोपरगाव–शिर्डीपर्यंत बायपास मार्ग विकसित करण्यात यावा, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) तर्फे करण्यात आली.
यासंदर्भात रिपाई पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. के. आव्हाड यांना घेराव घालत निवेदन सादर केले.
गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर अवजड वाहनांची मोठी रांग लागत असून, एखादे वाहन दोन-तीन मिनिटे थांबले तरी किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा तयार होतात. परिणामी शहरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. आतापर्यंत या महामार्गावरील अपघातांत शेकडो निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
महत्वाच्या मागण्या :
- रेल्वे ओव्हरब्रिजजवळ अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतीरोधक व सिग्नलची तातडीने उभारणी करावी.
- ओव्हरब्रिजच्या कोपऱ्यावरील ठिकाणाहून नागरिकांना रस्ता ओलांडताना सुरक्षित मार्ग मिळावा म्हणून खालील रस्ता दुरुस्त करून दिवाबत्तीची सोय करावी.
- तुफान चौक व पश्चिमेकडील रस्त्यांचा पर्याय उपलब्ध करून नागरिकांना शहरातून बाहेर पडणे सोयीस्कर करावे.
- पोस्टा कार्यालयाजवळ हायमास्ट लाईट उभारावा जेणेकरून रात्री रहदारी सुरक्षित होईल.
- शहरातून जाणाऱ्या रस्त्याला पर्याय म्हणून कौळाणे–निमगाव–नांदगाव–येवला–कोपरगाव–शिर्डी हा बायपास मार्ग विकसित करून एकतर्फी रस्ता करण्याचा विचार करावा.
रिपाई पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन तसेच तोंडी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने अखेर आज घेराव घालून आंदोलन उभे करण्यात आले.



