शेती

शेतकऱ्यांसाठी चिंता, या रासायनिक खताचे जागतिक मूल्य वाढले, टंचाई निर्माण होणार..?

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.३० ऑगस्ट २०२५ :- भारतात भात आणि मका या जास्त खत लागणाऱ्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्याने युरियाची मागणी झपाट्याने वाढली आहे. परिणामी जागतिक बाजारात युरियाचे दर ५३० डॉलर प्रति टनच्या पुढे गेले असून, देशांतर्गत शेतकऱ्यांसाठी खताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने युरियाचा साठा पुरेसा राहावा यासाठी तातडीची पावले उचलली असून, ४० लाख टन युरिया आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात २० लाख टन आणि सप्टेंबरमध्ये आणखी २० लाख टन युरिया आयात करण्याचे नियोजन केले आहे.

देशातील युरियाचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६१ टक्क्यांनी घटला आहे. खरीप हंगामात भात व मक्याचे क्षेत्रफळ वाढल्याने या दोन्ही पिकांना जास्त प्रमाणात रासायनिक खतांची आवश्यकता भासते. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामध्ये तफावत निर्माण झाली आहे.

जागतिक स्तरावरही भारताकडून वाढत्या मागणीचा परिणाम दिसून येत आहे. युरियाच्या दरात गेल्या काही आठवड्यांत सातत्याने वाढ झाली असून, ५३० डॉलर प्रति टन या उच्चांकापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे देशांतर्गत खत पुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

चीनकडून इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांना तुलनेने कमी दरात युरिया उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच धर्तीवर भारतालाही निकट भविष्यात दिलासा मिळू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा असलेला युरिया खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयातीचा पर्याय स्वीकारला असला तरी, वाढलेल्या जागतिक दरांचा परिणाम येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

 

◆ युरियाची सद्यस्थिती :
जागतिक दर : ५३० डॉलर प्रति टनच्या पुढे
भारतातील साठा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ६१ टक्के नी कमी

◆ सरकारचे नियोजन :
ऑगस्टमध्ये २० लाख टन आयात
सप्टेंबरमध्ये २० लाख टन आयात

◆ मागणी वाढण्याचे कारण :
भात व मका लागवड वाढ
खरीप हंगामातील खतांची जास्त वापर

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!