संशयाच्या कारणावरून चासनळीत पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२३ ऑगस्ट २०२५ :- निफाड व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात दि.२२ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. गावातील रहिवासी दिलीप मुजगुले यांनी संशयाच्या भरात पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिलीप मुजगुले हे चहाचा व्यवसाय करीत होते, तर त्यांची पत्नी स्वाती मुजगुले या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. पती-पत्नीमध्ये कायम भांडणे होत असल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपासून घरगुती कलह सुरू होता. दरम्यान, गुरुवारी रात्री दारूच्या नशेत दिलीप यांनी पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. घरातील भिंतीवर खडूने काही मजकूर लिहिलेला आढळून आला असून त्याचीही चौकशी सुरू आहे.
आज सकाळी मुजगुले दांपत्याचा दरवाजा उघडाच राहिल्याने शेजाऱ्यांना शंका आली. आवाज दिला तरी प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता, दिलीप पंख्याला लटकलेले व स्वाती मृत अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. दरवाजा तोडून उघडला असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व कोपरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी सह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
स्वाती मुजगुले या उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून पुरस्कारप्राप्त होत्या. सेवाभावी वृत्ती, मुलांवरचे प्रेम व मनमिळाऊ स्वभावामुळे त्या लोकप्रिय होत्या. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच गावात शोककळा पसरली. विशेषतः महिलांची मोठी गर्दी जमली होती. अनेक महिला त्यांच्या आठवणी सांगताना भावुक झाल्या आणि अश्रू अनावर झाले.
नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे आणि दारूच्या नशेतून उद्भवलेल्या या घटनेने संपूर्ण चासनळी गाव हादरले आहे.



