नाशिक ग्रामीण

नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा : सार्थक नेहेते

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवळा पोलीस ठाण्यात गणेश मंडळांचे नियोजन, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता मनोज महाजन, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून परवानगी घेण्याचं आवाहन केलं. उत्सवादरम्यान शांततेचा भंग होणार नाही आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. कोणत्याही व्यक्तीकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नियम आणि सूचना:
  •   वीज पुरवठा : वीज वितरण कंपनीकडून रोषणाईसाठी तात्पुरती वीज जोडणी घ्यावी आणि चांगल्या प्रतीच्या इलेक्ट्रिक सामानाचा वापर करावा.
  •  मिरवणूक : मिरवणुकीत वाहने पुढे-मागे घेताना किंवा ध्वज फिरवताना अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  •   ध्वनी प्रदूषण : आवाजाच्या प्रदूषणासंदर्भात असलेले नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत.
  • सामाजिक उपक्रम : अनावश्यक खर्च टाळून तो पैसा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरला तर सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असा सामाजिक संदेशही नेहेते यांनी दिला.

याचबरोबर, वीज वितरण कंपनीने उत्सवादरम्यान अखंडित वीज पुरवठा ठेवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. पोलीस ठाण्याने यावेळी कायदेशीर अटींची पूर्तता करणाऱ्या मंडळांसाठी विशेष बक्षीस योजना जाहीर केली असून, मंडळांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी परवानगी घेणे बंधनकारक असून, पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना पोलीस पाटलांनीही मंडळांना द्यावी.नागरिकांनी ‘पोलीस मित्र’ म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी केले. या बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील आणि विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!