टेक

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर सरकारचे नवीन नियम

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापरावर सरकारचे नवीन नियम

स्वत:ची प्रशंसा, पदनामासह पोस्ट यांना ‘ना’

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२८ जुलै २०२५ :- डिजिटल युगात माहितीचा वेग आणि सहजता वाढल्याने सोशल मिडिया हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. संवाद, लोकसहभाग, माहितीप्रसार या हेतूंनी या माध्यमांचा शासकीय पातळीवरही वापर होतो. मात्र सोशल मिडियाचा अति व असंवेदनशील वापर अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणीस कारणीभूत ठरतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने सोशल मिडियावर शासकीय कर्मचाऱ्यांनी कशी वर्तणूक ठेवावी, यासाठी नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २८ जुलै २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट उल्लेख आहे की, शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तींनी सोशल मिडियाचा वापर करताना जबाबदारीने व संयमाने वागावे. फेसबुक, एक्स (ट्विटर), युट्युब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यासारख्या समाजमाध्यमांचा वापर करताना नियमभंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

परिपत्रकानुसार, कोणत्याही केंद्र किंवा राज्य शासनाच्या धोरणावर, कृतीवर किंवा निर्णयावर शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मिडियावर प्रतिकूल टीका करणे टाळावे. वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मिडिया अकाऊंट वेगळे ठेवण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, आपल्या वैयक्तिक सोशल मिडिया अकाऊंटवर प्रोफाईल फोटो वगळता पदनाम, शासकीय लोगो, गणवेश, वाहन, इमारतींसारख्या शासकीय मालमत्तेचे फोटो, व्हिडिओ, रिल्स अपलोड करू नयेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

कार्यालयीन समन्वयासाठी व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल, मात्र त्या संवादाचे स्वरूप मर्यादित व उद्देशपर असावे. शासकीय योजनांची माहिती केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त माध्यमांतूनच प्रसारित केली जावी. अधिकृत प्राधिकृत व्यक्तीच्या मंजुरीशिवाय कोणतीही गोपनीय कागदपत्रे, दस्तऐवज, संक्षिप्त किंवा पूर्ण स्वरूपात सोशल मिडियावर शेअर करू नयेत.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयात केलेल्या विशेष कामगिरीबाबत सोशल मिडियावर उल्लेख करता येईल, मात्र त्या माध्यमातून स्वयंप्रशंसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. एखाद्या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत सहभागी झाल्यास त्या बाबत पोस्ट करता येईल, पण व्यक्तिगत श्रेय घेणारी भाषा किंवा भूमिकेपासून कर्मचाऱ्यांनी दूर राहावे, असे शासन स्पष्टपणे म्हणते.

याशिवाय, बदल्या झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मिडिया अकाऊंट जबाबदारीने व योग्यरीत्या हस्तांतरित करणे आवश्यक आहे. द्वेषमूलक, भेदभावास प्रोत्साहन देणारे, मानहानीकारक किंवा समाजात तणाव निर्माण करणारे पोस्ट, शेअर किंवा फॉरवर्ड केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

या मार्गदर्शक सूचनांचा भंग झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई होणार आहे.

सदर परिपत्रक सरकारच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७२८१८११४८७५०७ असा आहे. हे परिपत्रक राज्यपालांच्या आदेशानुसार व सुचिता महाडिक, सह सचिव, महाराष्ट्र शासन
डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!