येवल्यात रेबीज प्रतिबंधक लसी चा तुटवडा उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध करा – भागवतराव सोनवणे यांची मागणी
येवल्यात रेबीज प्रतिबंधक लसी चा तुटवडा उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध करा – भागवतराव सोनवणे यांची मागणी

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला | 29 जुलै 2025 :सध्या येवला तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेबीज प्रतिबंधक लस (Anti-Rabies Vaccine) ही येवला उपजिल्हा रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी व मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जलहक्क संघर्ष समिती व शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे-पाटील यांनी केली आहे.
ही मागणी नागपंचमीच्या दिवशी आयोजित जनता दरबारात, संपर्क कार्यालय येवला येथे मा. श्री दिलीप खैरे (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्याहस्ते मा. छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
⚠️ श्रावण-भाद्रपदात कुत्रे अधिक आक्रमक – नागरिकांमध्ये भीती
निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की,
> “श्रावण आणि भाद्रपद महिन्यांमध्ये कुत्रे अधिक आक्रमक बनतात आणि चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.”
सध्या लस तातडीने लागल्यास कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते, परंतु सरकारी रुग्णालयात ही लस नेहमीच उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. यामुळे आर्थिक अडचणी वाढतात.
📌 मागणीचे ठळक मुद्दे:
रेबीज लस उपजिल्हा रुग्णालयात आणि पीएचसी स्तरावर कायमस्वरूपी उपलब्ध असावी
ती पूर्णतः मोफत देण्यात यावी
लसीचा साठा नियमित अद्ययावत ठेवावा
मोकाट कुत्र्यांविरोधात स्थानिक प्रशासनाने संवेदनशीलतेने मोहीम राबवावी
यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी होईल आणि गरजू नागरिकांना वेळेवर मदत मिळेल, असा विश्वास भागवतराव सोनवणे यांनी व्यक्त करण्यात आला आहे.



