ग्रामसुरक्षा दलाचा पाच तास थरारक पाठलाग ; शिरवाडे वाकदमध्ये चोरट्यांची धावपळ; सतर्कतेचे ठळक परिणाम

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २३ डिसेंबर २०२५ :- परिसरात वाढलेल्या भुरट्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लासलगाव पोलिस ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाने अवघ्या काही दिवसांतच आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. सोमवार (दि.२२) रात्री तब्बल पाच तास चाललेल्या थरारक पाठलागामुळे चोरट्यांना गावातून पळ काढावा लागला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रशीद शेख यांच्या घराजवळील गोठ्याचा दरवाजा तोडत असताना चोरट्यांचा डाव घरातील महिलेच्या आरडाओरडीमुळे उधळला. परिस्थिती चिघळताच चोरट्यांनी बद्रीनाथ आवारे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. तेथे कुत्र्यांना शांत करण्यासाठी मांस टाकण्यात आले; मात्र घरातील महिलेने खिडकी उघडताच चोरट्यांनी तेथूनही पळ काढला. यानंतर राज्यमार्ग ७ वरील शिरवाडे फाटा परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्क होऊन तात्काळ परिसरात शोधमोहीम सुरू केली. अंधारात एक चोरटा दिसून आला; मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. या दरम्यान लासलगाव पोलिस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेदरम्यान विनानंबरची मोटारसायकल आढळून आली असून, त्यावरून चोरट्यांचा अंदाज बांधण्यात पोलिसांना यश आले आहे. संपूर्ण घटनाक्रमात स.पो.नि. भास्करराव शिंदे हे पाच तास ग्रामसुरक्षा दलाच्या सतत संपर्कात होते. गावात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मात्र ग्रामसुरक्षा दल व ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे हाणून पाडण्यात आला. यापूर्वीही रविवारी रात्री ग्रामसुरक्षा दलाने पहाटे दोनच्या सुमारास संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून ते शिरवाडे फाट्याजवळ पकडले होते. सदर वाहन पोलिस हवालदार डी.डी.जाधव, राहुल घोलप, औदुंबर मुरडनर, संदीप शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आले होते.
गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लासलगाव पोलिसांनी उचललेले ग्रामसुरक्षा दलाचे पाऊल आदर्श ठरत आहे. पहिल्या टप्प्यात शिरवाडे वाकद येथे दलाची स्थापना करण्यात आली असून सदस्यांना काठ्या व शिट्ट्या देण्यात आल्या आहेत. रात्री गस्त, संशयास्पद हालचालींवर लक्ष आणि तात्काळ पोलिस संपर्काच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
@ ग्रामसुरक्षा दलामुळे गावाच्या सुरक्षेची जबाबदारी सामूहिक पातळीवर घेतली जात आहे. नागरिकांची जागरूकता आणि युवकांच्या रात्रगस्तींमुळे गुन्हेगारांना गावात थांबणे कठीण झाले आहे. ही पद्धत इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
– भास्करराव शिंदे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक, लासलगाव



