
पत्रकार संघाची बैठक संपन्न
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मनमाड येथील जनश्रद्धा कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी हे होते.
सभेस संघाचे संस्थापक अमोल खरे, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर, सरचिटणीस निलेश वाघ, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरहरी उंबरे, मारुती जगधने, जहूर खान, सतीश शेकदार यांच्यासह संघाचे अनेक पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी संघाचे कार्याध्यक्ष उपाली परदेशी यांनी मागील सभेचे इतिवृत्त तसेच जमाखर्चाचा तपशील सभेपुढे सादर केला. यावर उपस्थित सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर सदर इतिवृत्त व जमाखर्च अहवालास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यानंतर संघामार्फत मागील वर्षभरात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, बैठका, सामाजिक व पत्रकार हिताचे आंदोलने यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आयत्यावेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करून त्यावर योग्य निर्णय घेण्यात आले.
सभेत संघाच्या सदस्यांच्या दिवंगत नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मनमाड व नांदगाव नगरपरिषदेत नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक, संघाच्या सदस्यांना मिळालेल्या विविध नियुक्त्या, पुरस्कार तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. याप्रसंगी काही पत्रकार सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.
संघाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात संघाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या. अनेक पत्रकारांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.
येत्या ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त नांदगाव येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच संघाचे कार्य अधिक सक्षम व प्रभावीपणे राबविण्यासाठी नांदगाव–मनमाड समिती गठीत करण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला.
सभेचे अध्यक्ष नरेश गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाची एकजूट कायम ठेवणे, सामाजिक बांधिलकी जपणे तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघाने ठाम व स्पष्ट भूमिका घ्यावी, असे मार्गदर्शन केले.
सभेचे सूत्रसंचालन उपाली परदेशी यांनी केले तर अशोक बिदरी यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी अनिल निरभवणे, प्रमित आहेर, तुषार गोयल, बाबासाहेब बोरसे, गणेश केदारे, रुपाली केदारे, राजू लहिरे, बापू मार्कंड, मिलिंद वाघ, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, रामदास सोनवणे, राजेंद्र धिंगाण, प्रणव हरकल, पंकज जाधव, विनायक कदम आदी पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



