या ठिकाणी आढळला किराणा दुकानात गांजा, पोलिसांची धडक कारवाई, ८ किलो अवैध गांजासह इसम जेरबंद

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि. २ सप्टेंबर २०२५ :- नाशिक ग्रामीण जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत निफाड पोलिसांनी केलेल्या धाडीत एका इसमाला ८ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार २६ ऑगस्ट रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने निफाड शहरातील पेठगल्ली येथील गणेश किराणा दुकानावर छापा टाकला. तपासा दरम्यान दुकानातील लाकडी दरवाज्याच्या पाठीमागे ठेवलेल्या काळ्या बॅगेत चार पॅकेट्समध्ये एकूण ८ किलो गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावाने किंमत सुमारे १ लाख ६० हजार रुपये एवढी आहे.
या कारवाईत संदिप उर्फ गणेश आशोक राऊत (वय ४५, रा. पेठ गल्ली, निफाड) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि सोनल फडोळ करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पो.नि. गणेश गुरव, स.पो.नि सोनल फडोळ, किरण ढेकळे, कपालेश्वर ढिकले, अनिल शेरेकर, सारिका जाधव, राजेंद्र दरोडे, विक्रम लहाणे, विनोद जाधव व धनंजय बैरागी यांचा समावेश होता.
निफाड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.



