दिंडोरीः एवढ्या लाखाची अभियंत्यांनी घेतली लाच

वेगवान नाशिक / सागर मोर
दिंडोरी:पाणीपुरवठा योजनेचे मंजूर केलेल्या बिलाच्या मोबदल्यात बक्षीस आणि प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात दोन लाख १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना रंगेहाथ पकडले. दिंडोरी येथे ही कारवाई करण्यात आली.
उपअभियंता योगेश नारायण घारे (वय ४४, रा. ६०१., तरुमाला भूमिका, बी विंग, द्वारका), कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव (२९, रा. कुंजविहार सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार शासकीय ठेकेदार असून, त्यांनी सावरपाडा (ता. दिंडोरी) येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेंतर्गत शिवारपाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात, तसेच सध्याच्या प्रलंबित असलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाख १६ हजारांची लाच मागितली होती.
उपअभियंत्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा अधिकारी अमोल वालझाडे, स्वप्नील राजपूत, हवालदार संदीप हादंगे, सुरेश चव्हाण, किरण धुळे, परशुराम जाधव यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचखोर अभियंत्याच्या घराची झडती घेण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



