या गावात उद्या होणार सोनू कुत्र्याचा दशक्रिया विधी ; महाप्रसादाची पंगतही उठणार.. काय आहे या अवलिया सोनूचा महिमा..?
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक ७ डिसेंबर २०२५ :- “संतसमागम एखादिये परी। व्हावें त्याचें द्वारी श्वानयाती॥ तेथे रामनाम होईल श्रवण। घडेल भोजन उच्छिष्टाचे॥”
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी एखाद्या भक्तावर किती नेमक्या लागू पडू शकतात, याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे शिवडी ता.निफाड या गावातील हा धार्मिक श्वान सोनू. गेली सोळा वर्षे वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांशी, आरत्या, कीर्तनांशी आणि गावातील प्रत्येक धार्मिक विधीशी जिव्हाळ्याने जोडलेला हा जीव मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ रोजी अनंतात विलीन झाला. आज सोमवार दिनांक ८ रोजी शिवडी येथे त्याचे उत्तरकार्य मोठ्या थाटात संपन्न होत आहे.
या श्वानाचे संपूर्ण आयुष्य धार्मिक कार्यात व यात्रेतच घडले. गावातील वारकरी मंडळी मार्गस्थ होताच तो त्यांच्यात सहज मिसळत असे. शिवडी ते त्र्यंबकेश्वर गुरु नथूसिंग महाराज पालखी सोहळा असो किंवा शिवडी ते शिर्डी पालखी यात्रा दोन्हीही दिंड्यांमधून तो वर्षानुवर्षे पायपीट करत असे. दिंडीसोबत दिवसभर चालणे, भजन कीर्तनांच्या ठिकाणी शांतपणे बसणे, पुजाऱ्यांच्या चरणाशी राहणे आणि पालखी थांबली की, सावलीत विसावणे त्याचे संपूर्ण आयुष्यच वारकरी संप्रदायाशी झोकून दिल्यासारखे होते. श्रीराम मंदिर व विठ्ठल मंदिर परिसर हेच त्याचे कायम वास्तव्य. याच परिसरात तो दिवस रात्र दिसायचा. काकड आरतीची घंटा वाजली की, तो सर्वात आधी मंदिरासमोर उपस्थित असायचा. सायंकाळचा हरिपाठ झाला की, तो गर्दीत आपली जागा शोधून शांतपणे बसायचा. मंदिरातील पुजाऱ्यांपासून ते भाविकांपर्यंत सर्वांशी त्याचा आपुलकीचा नातेवाईकपणा तयार झाला होता.
सोनुचा गावातील प्रत्येक धार्मिक विधीत सहभाग केवळ दिंडी किंवा आरत्यांपुरता मर्यादित नव्हता. तो गावातील कुणाचाही अंत्यविधी, दशक्रिया, वर्षश्राद्ध, पूजा अर्चा, हळदी कुंकू कार्यक्रम या सर्व ठिकाणीही तो विनाविलंब पोहोचायचा. कुठे शोकसभा, कुठे मिरवणूक, कुठे कीर्तन असो, एकंदरीत जिथे जमाव, तिथे त्याची शांत उपस्थिती असायची. यामुळे गावकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल भक्तिभावासारखा आदर निर्माण झाला होता.
कोणतीही पंगत असो पहिला मान सोनूलाच, त्यानंतर कार्यवाहकाप्रमाणे सोनू रुबाबात सर्व पंगतीत फेरफटका मारत असे. शिवडी ही दिंडी संस्कृती जपणारे गाव. या गावात दरवर्षी येणारे वारकरी, हरिभक्त, कीर्तनकार, भजनी मंडळ यांना सोनू परिचयाचा झाला होता. त्याच्या निष्ठेने यात्रेकरूंचे पाय थांबत असत. अनाहुत पाहुणे सोनू सोबत फोटो, व्हिडिओ काढत असत. असा हा “वारकरी श्वान” गावातील सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मंगळवारी त्याच्या निधनाची बातमी गावात व पंचक्रोशीत कळताच हळहळ व्यक्त झाली. मंदिर परिसरात शांततेने बसणारा, दिंडीसोबत धावणारा आणि सर्वांना परिचित झालेला हा जीव अचानक निघून गेल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. अशा या सोनुचे गावकऱ्यांनी मोठे उत्तरकार्य करण्याचे नियोजन केले आहे. ग्रामस्थांनी उत्तरकार्यासाठी नियोजन केले असून पत्रिकाही छापली आहे. सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. विनता नदी तीरावर होणार आहे. याप्रसंगी श्रीराम सीता मंगल कार्यालय येथे महाप्रसाद होणार आहे.



