शेती

प्रहारची तोफ खामखेड्यात धडाडणार! …अन्यथा शेतकरी म्हणतील कांद्यावर बोला?

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या त्वरित मदतीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांची राज्यव्यापी ‘शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा’ आता नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवळा तालुक्यातील खामखेडा येथे या संघर्ष यात्रेनिमित्त भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात बच्चू कडू केवळ कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत या मुद्यांवरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या इतर ज्वलंत प्रश्नांवर, शेतीमालाच्या भावावर आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणांवरही सडकून टीका करण्याची शक्यता आहे.

प्रा. यशवंत गोसावी आणि गणेश निंबाळकर हेदेखील आपल्या परखड भाषणांनी ‘तोफ डागणार’ आहेत. गोसावी आणि निंबाळकर यांचे प्रभावी वक्ते म्हणून असलेले स्थान पाहता, तेदेखील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकारला चांगलेच जाब विचारतील अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे.

बच्चू कडूंच्या हक्क यात्रेला राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळवत असल्याने खामखेडा येथील या मेळाव्यात ते सरकारला काय इशारा देतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकरी म्हणतील कांद्यावर बोला?

कसमादे परिसरातील कांदा हे मुख्य पीक असून कांद्यावर या भागातील शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यातच यावर्षी कांद्याला सातत्याने उत्पादन खर्चपेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे बच्चू कडू यांच्यासह प्रा. गोसावी व निंबाळकर यांना कांद्याच्या मुद्यावर विशेषतः लक्ष घालावे लागणार आहे. अन्यथा कांद्यावर बोला असे शेतकरी बोलले तर यात नवल नव्हे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!