कार चोरी प्रकरणात नवीन ट्विस्ट, फायनान्स कर्ज बुडवण्यासाठी रचला बनाव; सीसीटीव्ही फुटेजने फसवणूक उघड ; ७२ तासांत लासलगाव पोलिसांचा पर्दाफाश

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२६ जानेवारी :- दोन फायनान्स कंपन्यांचे कर्ज बुडवण्यासाठी स्वतःची कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणाऱ्या तरुणाचा डाव लासलगाव पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणला. सदर कार नाशिक येथील स्क्रॅप बाजारातून जप्त करण्यात आली असून संबंधित फिर्यादीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी ऋषीकेश शांताराम क्षिरसागर (रा. शिवडी, ता. निफाड) यांनी मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार (क्र. MH-15 DH 6056) चोरीला गेल्याची तक्रार २० जानेवारी २०२६ रोजी लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. विंचूर ते थेटाळे रोडवरून वनीकरण परिसरातून जात असताना कार अचानक बंद पडल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कार चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळासाहेब कांदळकर करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर वाहन हे २७ डिसेंबर २०२५ रोजी पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथून नाशिकच्या दिशेने नेण्यात आले होते. त्यानुसार पिंपळगाव येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित कार नाशिककडे गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी नाशिक येथील स्क्रॅप बाजारात चौकशी केली असता फिर्यादी ऋषीकेश क्षिरसागर याने त्याची सेलेरिओ कार २७ डिसेंबर २०२५ रोजी नाशिकमधील एका स्क्रॅप कार खरेदी-विक्रेत्यास ५२ हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. सदर कार स्क्रॅप विक्रेत्याकडून तात्काळ जप्त करण्यात आली.
पोलीस ठाण्यात बोलावून उलट चौकशी केली असता प्रथम फिर्यादीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली की, सदर कारवर दोन फायनान्स कंपन्यांचे कर्ज होते. कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्यानंतर फायनान्स कंपन्यांकडून कर्जाचे हप्ते माफ होतील तसेच कार स्क्रॅप करून पैसे मिळतील, या उद्देशानेच त्याने हा बनाव रचला होता. खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाल्याने ऋषीकेश क्षिरसागर याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, पोलीस हवालदार बाळासाहेब कांदळकर, संदीप निचळ, पोलीस नाईक संदीप धुमाळ, पोलीस शिपाई सागर आरोटे, अविनाश सांगळे व अवधूत होंडे यांचा समावेश होता.



