वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.१३ ऑगस्ट २०२५ :- दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा मार्केट यार्ड परिसरात उभ्या असलेल्या दोन मालट्रकांच्या डिझेल टँक मधून ३८,६८८ रुपये किंमतीचे ४२५ लिटर डिझेल लबाडीच्या इराद्याने चोरून नेले होते. सदर प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुरनं १४३/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्था.गु.शा.च्या पथकाने राहता तालुका परिसरातून गुन्हेगार प्रसाद दत्तात्रय वाडेकर (वय २१, रा. रांजणगाव खुर्द, गणेशनगर, ता. राहाता, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार अमोल कुंदे (रा. एकरूखे, ता. राहाता) व अजय भोसले (रा. शिर्डी, ता. राहाता) यांच्यासह इनोव्हा व इर्टिगा कारमधून सायखेडा कांदा मार्केट परिसरात येऊन उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले डिझेल विकून त्यातील आलेले पैसे आरोपींनी आपापसात वाटून घेतल्याचेही निष्पन्न झाले.
आरोपी प्रसाद वाडेकर याच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची इनोव्हा कार (क्रमांक एमएच ०४ डीजे ४१११) व रोख १२,६०० रुपये असा एकूण ७,१२,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रसाद वाडेकर याच्यावर यापूर्वी मनमाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून, फरार आरोपी अजय भोसले व अमोल कुंदे यांच्यावर यापूर्वी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही या आरोपींनी मुंबई-आग्रा हायवेवरील दहावा मैल परिसर, सायखेडा व सिन्नर-शिर्डी महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केल्याचे सांगितले असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पो.उ.नि सुदर्शन बोडके, स.पो.उ.नि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, सतीश घुटे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.