आर्थिक

२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या उड्डाणाला बळ देणारा – मंत्री छगन भुजबळ

२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या उड्डाणाला बळ देणारा – मंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव

नाशिक,दि.१ फेब्रुवारी:-केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारमण यांनी सलग नवव्यांदा सादर केलेला २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या दीर्घकालीन विकासदृष्टीचा स्पष्ट आणि भक्कम आराखडा मांडणारा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ च्या विकसित भारत संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारा सर्वसमावेशक व विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

अर्थसंक्ल्पावरील प्रतिक्रियेत मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक, दिव्यांग, उद्योग आणि नव्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला भविष्योन्मुख दस्तावेज आहे. कररचनेत स्थैर्य राखत विविध क्षेत्रांत मोठ्या घोषणा करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न यामधून स्पष्ट दिसतो. आरोग्य आणि सामाजिक कल्याण क्षेत्रासाठी घेतलेले निर्णय अतिशय दिलासादायक आहेत. कॅन्सरसाठी १७ औषधे तसेच सात दुर्मिळ आजारांवरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय हा लाखो रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरेल. दिव्यांगांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘दिव्यांगजन कौशल्य योजना’, ‘दिव्यांग सहारा योजना’ आणि केंद्रीय दिव्यांग केंद्राच्या घोषणांमधून सरकारची समावेशक विकासाची भूमिका ठळकपणे दिसून येते असे त्यांनी म्हटले आहे.

रोजगार आणि कौशल्य विकासावर दिलेला भर हा देशाच्या तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेमिंग, कंटेंट क्रिएशनसारख्या नव्या क्षेत्रांसाठी १५ हजार शाळांमध्ये विशेष लॅब्स उभारून २०३० पर्यंत २० लाख व्यावसायिक घडवण्याचा संकल्प हा डिजिटल आणि क्रिएटिव्ह इंडियाला नवे बळ देणारा आहे. तसेच She-Martsसारख्या महिला सशक्तीकरण योजनांमुळे नारीशक्तीला आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल. पुणे–हैदराबादसह सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉर्समुळे प्रवास सुलभ होईल, व्यापाराला चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होईल. सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी ४० हजार कोटींची तरतूद, रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर्स आणि डेटा सेंटर्ससाठी टॅक्स हॉलिडे या घोषणा भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या दिशेने निर्णायक ठरतील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कृषी आणि उद्योग क्षेत्रालाही या अर्थसंकल्पातून नवे बळ मिळाले आहे. नारळ, काजू, कोको, बदाम यांसारख्या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी विशेष योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. टेक्सटाईल आणि चामडा उद्योगांसाठी निर्यात शुल्क कपात केल्याने ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढेल. वित्तीय तूट ४.३ टक्क्यांवर नियंत्रित ठेवत आर्थिक शिस्त आणि विकास यांचा समतोल साधण्यात आला आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावरील विश्वास अधिक दृढ होईल असे त्यांनी सांगितले.

२०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा समावेशक, भविष्योन्मुख आणि संधी निर्माण करणारा असून, रोजगार, कौशल्यविकास, नवोन्मेष आणि सामाजिक न्याय यांना चालना देणारा आहे. आता प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असून, हा अर्थसंकल्प भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच आशादायक ठरेल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!