नाशिक ग्रामीण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जालना पथकाकडून खामखेडा गावाची पाहणी

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची मंगळवारी (दि. १२ मे) जालना येथील तपासणी पथकाकडून सखोल पाहणी व मूल्यांकन करण्यात आले. पारंपरिक वाद्ये, आदिवासी नृत्य आणि आकर्षक रांगोळ्यांच्या गजरात ग्रामस्थांनी पथकाचे उत्साहात स्वागत केले.
१७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या अभियानात खामखेडा गावाने सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तपासणी दरम्यान पथकाने ग्रामपंचायतीमार्फत राबवलेल्या स्वच्छता मोहिमा, शुद्ध पाणीपुरवठा, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सौर दिवे आणि शाळा-अंगणवाड्यांच्या सुशोभीकरणाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून पूर्ण झालेल्या विकासकामांचे पथकाने कौतुक केले.
यावेळी पथकाने जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि श्रीराम मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष कामांची पडताळणी केली. तसेच घरकुल योजना आणि मनरेगांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला.
या पथकात जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीपजी पवार, देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतजी पवार, जालना येथील बालविकास प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता जी.रा. जंजाळ, विस्तार अधिकारी व्ही. एम. नागरगोजे, तालुका व्यवस्थापक अरविंद उघडे, कृषी विस्तार अधिकारी पी. व्ही. शेरे, तसेच गिरीश पै, गणेश मोरे, अंकुश वाघ, देवळा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी सुदर्शन कारवाळ, विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे आदींसह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
यावेळी लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, उपसरपंच सुशिलाबाई शेवाळे, सदस्य श्रावण बोरसे, विमलबाई मोरे, गणेश शेवाळे, रामचंद्र बोरसे, गीताबाई अहिरे, ज्योती सोज्वळ, रेखा पवार, अंबर सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल नांदरे यांच्यासह गावातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



