नांदगावात किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग आणि जातीय शिवीगाळ; तीन जणांवर गुन्हा दाखल
Nandgaon news
नांदगावात किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग आणि जातीय शिवीगाळ; तीन जणांवर गुन्हा दाखल
वेगवान मराठी : दि . 16 में 2026
नांदगांव:
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला जातीय शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना नांदगाव येथील जुना पावर हाऊस भागात घडली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकाच वस्तीत राहतात. १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपींच्या घरातील मुलांनी फिर्यादीच्या घराच्या छतावरील पत्र्यांवर दगड फेकले. यावर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने मुलांना “छतावर दगड फेकू नका” असे सांगितले.
या साध्या बोलण्याचा राग मनात धरून मुख्य संशयात आरोपी अन्सार निसार शेख, त्याची आई आणि बहीण यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरात प्रवेश केला.
विनयभंग आणि मारहाण:
आरोपींनी फिर्यादीला तिच्या जातीचा उल्लेख करून जाहीरपणे अपमानित केले व अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, मुख्य संशयीत आरोपी अन्सार याने फिर्यादीच्या अंगाला हात लावून तिचा विनयभंग केला, अंगावरील कपडे ओढून धक्काबुक्की केली आणि तिच्या डोक्यावरील कृत्रिम केसांचा टोप (विग) ओढून काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी फिर्यादीचे पती मध्यस्थी करण्यासाठी आले असता, संशयीत यांनी त्यांना हाताने चापट मारून “तेरे को देखता हूँ” अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
पोलीस कारवाई:
या गंभीर घटनेनंतर पीडित महिलेने नांदगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ७४, ११५(२), ३५१(२)(३), ३५२, ३५३(५)
अॅट्रॉसिटी कायदा (SC/ST Act) कलमे: ३(१)(r)(s), ३(१)(w)(i)(ii), ३(२)(va)
या प्रकरणाचा पुढील तपास मनमाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) . बाजीराव महाजन करत आहेत.



