छत्तीस चारी अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रम अभियान संपन्न
छत्तीस चारी अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रम अभियान संपन्न

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला 15 ऑक्टोबर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प येवला दोनच्या वतीने तालुक्यातील धुळगाव बिटातील छत्तीस चारी अंगणगाव येथील अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रम अभियान प्रकल्प अधिकारी श्रीमती आरती गांगुर्डे मुख्यसेविका सरला ठोंबरे ,ब्राम्हकुमारीच्या नीता दिदी सरपंच भारती गाढे ग्रामविकास अधिकारी गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी पोषण महा अभियान हे कुपोषणाशी लढण्यासाठी सुरु केलेला एक महत्वाचा कार्यक्रम असून यात शून्य ते सहा वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला स्तनदा माता यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती देऊन सर्व अंगणवाडी सेविकांनी या हे अभियान यशस्वीपणे राबवावे असे आवाहन केले. तर मुख्यसेविका सरला ठोंबरे यांनी या कार्यक्रमामुळे अंगणवाडी केंद्राची पायाभूत सुविधा सुधारते आणि पूरक पोषण आहार आरोग्य शिक्षण, आरोग्य तपासणी या सारख्या सेवांची गुणवत्ता वाढण्यास मदत होत असल्याची माहिती देऊन सखोल मार्गदर्शन करून पोषण आहाराचे महत्व पटवून दिले. यावेळी धुळगाव बिटातील सर्व अंगणवाडी सेविकांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या पौष्टिक पदार्थांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.या कार्यक्रमात गरोदर मातेची ओटीभरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे व मुख्यसेविका सरला ठोंबरे यांनी बालविवाह विरोधी व पोषण प्रतिज्ञा दिली,प्रकाश उगलमूगले यांनी प्रास्ताविक करून या पोषण आहारl सप्ताहाचे महत्व विषद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्योती उगलमूगले, प्रगती धिवर, सीमा गायकवाड मिरा वाणी आदींनी परिश्रम घेतले



