उत्तर-पूर्व भागात लाल कांदा लागवड जोरात…पाऊस ओसरला, शेतकऱ्यांची लगबग सुरू

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
येवला :-
दिनांक 10 ऑक्टोबर 2025
गेल्या दोन आठवड्यांच्या मुसळधार पावसानंतर आता वातावरणात उघडीप मिळाल्याने शेतकरी वर्गाने पुन्हा शेतात धाव घेतली आहे. ऑक्टोबर हिटसारखे ऊन पडू लागल्याने आणि उत्तर-पूर्व भागातील मुरमाड जमिनींमधील पाण्याचा निचरा झाल्याने लागवडीस पोषक वातावरण तयार झाले आहे. काही गावात तर लागवड केलेल्या कांद्यावर स्प्रिंकलर लावून पाणी दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील राजापूर, ममदापुर, कोळगाव, वाई बुथी, रेंडाळे, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, न्यारखेडे खुर्द, न्यारखेडे बुद्रुक, रहाडी, खरवंडी, देवदरी, वाघाळे, डोंगरगाव, आडसुरेगाव, पांजरवाडी, अंगुलगाव आणि सायगाव,कोटखेडे, तळवाडे या परिसरात कांदा लागवडीची कामे जोमात सुरू असून शेतांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य दिसू लागले आहे.
पावसामुळे काही दिवस शेतीकाम ठप्प झाले होते. मात्र आता जमिनीत लागवडीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबं शेतात राबणारी दृश्ये सर्वत्र पाहायला मिळत आहेत. घरधनी रोप उपटून क्रेटमध्ये भरून वाफ्यांपर्यंत नेत आहेत, तर महिला वर्ग रोपांची लागवड करण्यात व्यस्त आहे. शाळकरी विद्यार्थीही शाळे नंतर आई-वडिलांसोबत शेतात मदत करताना दिसत आहेत.
दरम्यान, पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्यावर औषध फवारणीचे कामही सुरू असून शेतकरी उत्पादन टिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सध्या नव्या कांद्याला भाव कमी मिळत असला तरी फेब्रुवारी मध्ये चढे भाव राहतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत या भागातील शेतकऱ्यांना लाल कांद्याने मोठी आर्थिक मदत मिळाल्याने यंदा विक्रमी कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.
काही शेतकरी बाहेरून दर्जेदार रोपे विकत आणून लागवड करत आहेत, तर काही ठिकाणी पावसाने खराब झालेल्या शेतांमध्ये दुबार लागवड सुरू आहे. हवामान अनुकूल राहिल्यास यंदा कांद्याचे पीक समाधानकारक येईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.
“उत्तर-पूर्व भाग हा लाल, रांगड्या आणि पोळ कांद्याचा पट्टा म्हणून ओळखला जातो. लाल कांदा हे या भागातील एकमेव नगदी पीक आहे. पाणीटंचाईमुळे उन्हाळ कांद्याचे उत्पादन येथे मर्यादित होते, त्यामुळे हिवाळी लाल कांद्याशिवाय पर्याय नाही:-
भागवतराव सोनवणे,
कर्जमुक्त शेतकरी अभियान
##########
“लाल कांद्या शिवाय पर्याय नाही, लाल कांद्यामुळे वर्षभराची बेगमी होते, लाल कांद्यामुळेच मुलांच्या शाळेची फी भरणे शक्य होते… पीक चांगले येणार असले तर दिवाळीत आम्हाला दुकानदार उधारीत सामान पण देतात त्यामुळे दिवाळी गोड होते…यंदा अति पावसानं बेजार झालो असलो तरी पून्हा नव्याने सुरुवात करीत आहे… शेती हेच एकमेव उपजीविकेचे साधन आहे, भाव मिळो न मिळो पिकविण्याशिवाय पर्याय नाही…
मजूर न लावता घरचेच लोक राबतात त्यामुळे परवडते…”
– संपत आहेर, कांदा उत्पादक शेतकरी



