नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नस्तनपुर शनेश्वर यात्रेत भाविकांनी घेतले दर्शन

Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने दिनांक 16 मे 2026

नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथील प्राचीन श्री शनिश्वर महाराज मंदिरात दि. १६ मे रोजी शनि अमावस्येनिमित्त भव्य यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. साडेतीन शनी पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळख असलेल्या या पवित्र स्थळी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दिवसभर मनोभावे दर्शन घेत श्री शनिदेवांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.
पुरातन काळापासून या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व लाभलेले आहे. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामचंद्र अगस्ती ऋषींच्या दर्शनासाठी या परिसरात आले होते. त्यावेळी अगस्ती ऋषींनी दिलेल्या सूचनेनुसार प्रभू रामचंद्रांनी नस्तनपुर येथे श्री शनिश्वर महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून हे स्थान श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.
दर शनिवारी येथे यात्रा भरत असली तरी शनि अमावस्येच्या दिवशी विशेष महत्त्व असल्याने यावर्षीही मोठ्या प्रमाणावर भक्तांनी उपस्थिती लावली. पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. “जय शनिदेव”च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.
यात्रेनिमित्त शनेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रसादाची तसेच दर्शन रांग व्यवस्थेची उत्तम सोय करण्यात आली होती. स्वयंसेवक आणि ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी दिवसभर भाविकांना मार्गदर्शन करत शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था राखली.
यावेळी मंदिर परिसरात लाखो वाहने दाखल झाल्याने काही काळ वाहतुकीवर ताण निर्माण झाला होता. मात्र पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि ट्रस्टच्या समन्वयातून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाविकांनीही शांततेत आणि शिस्तीत दर्शन घेत पुढील प्रवास सुरू ठेवला.
शनि अमावस्येनिमित्त झालेल्या या भव्य यात्रेमुळे नस्तनपुर परिसर पूर्णतः भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!