नाशिक ग्रामीण
घरचा भेदी लंका ढवळतो : होलसेल किराणा दुकानातील कामगारांकडून अपहार . दोन अटकेत .
Nandgaon Naws
घरचा भेदी लंका ढवळतो : होलसेल किराणा दुकानातील कामगारांकडून अपहार . दोन अटकेत .
वेगवान मराठी : मारूती जगधने
दि ३१ डिसेंबर २०२५
नांदगाव शहरात “घरचा भेदी लंका ढवळतो” या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना उघडकीस आली असून, किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या विश्वासू कामगारांनीच दुकानातील लाखोंचा माल लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
नांदगाव शहरातील समता मार्ग, मस्तानी अम्मा दर्ग्यालगत असलेल्या प्रतिष्ठित किराणा होलसेल व्यापारी अमोल नावंदर यांच्या दुकानात होलसेल तसेच रिटेल किराणा मालाची विक्री केली जाते. त्यांच्या दुकानात ७ ते ८ कामगार कार्यरत असून, त्यापैकी रविंद्र रामदास बच्छाव व नितीन रामदास गोफने हे दोघे मागील दोन वर्षांपासून कामावर होते. या दोघांवर दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमधून ग्राहकांना किराणा माल देण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवण्यात आली होती.
मात्र, मागवलेल्या मालाचा साठा व विक्री झालेल्या मालामध्ये तफावत आढळून आल्याने नावंदर यांच्या लक्षात संशयास्पद बाब आली. त्यांनी १ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गोडाऊनमधील मालाची तपासणी केली असता विविध किराणा वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली.
याबाबत विचारणा केली असता संबंधित कामगारांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने नावंदर यांची खात्री झाली की, दोन्ही कामगारांनी संगनमताने गोडाऊनमधील किराणा मालाचा अपहार केला आहे.
अपहार झालेल्या मालामध्ये—
गायछाप तंबाखू कंपनीचे १५ पोते (प्रत्येकी ₹८,५००)
सोयाबीन वडीच्या २० किलो वजनाच्या ५० गोण्या (प्रत्येकी ₹१,२२५)
राजभोग तांदळाच्या २० किलो वजनाच्या ५० गोण्या (प्रत्येकी ₹२,४००)
सोयाड्रॉप तेलाचे १५ किलो वजनाचे १०० कॅन (प्रत्येकी ₹२,१००)
असा एकूण ₹५,१८,७५० रुपयांचा किराणा माल अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमोल नावंदर यांनी दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात संशयीत
रविंद्र रामदास बच्छाव (रा. श्रीरामनगर, नांदगाव) व नितीन रामदास गोफने (रा. बसस्थानकाजवळ, नांदगाव) यांच्याविरोधात विश्वासघात व अपहाराची तक्रार दाखल केली असून,घटनेतील दोघा संशयतांना नांदगाव पोलिसांनी अटक केलेले आहे .
पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.



