रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात रेशनमध्ये मोठा बदल

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 8 जानेवारी 2026 – नाशिक: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेशनवरील धान्यवाटप प्रणालीत पुरवठा विभागाने महत्त्वाचे बदल केले आहेत. आता रेशन दुकानांमधून मिळणारी ज्वारी पूर्णपणे बंद करण्यात आली असून, गहू आणि तांदळाच्या प्रमाणात मोठा फेरबदल करण्यात आला आहे.
जानेवारी २०२६ पासून ‘प्राधान्य कुटुंब’ आणि ‘अंत्योदय’ योजनेतील लाभार्थ्यांना या सुधारित बदलानुसार धान्य मिळणार आहे.
काय झाले आहेत नवीन बदल?
पुरवठा विभागाने केलेल्या नवीन नियमांनुसार धान्याचे वाटप खालीलप्रमाणे असेल:
-
अंत्योदय रेशन कार्डधारक: या लाभार्थ्यांना आता प्रति कार्ड २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ मिळणार आहे. पूर्वी गव्हाचे प्रमाण १५ किलो होते, त्यात आता थेट ६ किलोची वाढ करण्यात आली आहे.
-
प्राधान्य कुटुंब लाभार्थी: या गटातील सदस्यांना प्रति सदस्य ५ किलो धान्य मिळते. आता त्यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असा बदल करण्यात आला आहे. पूर्वी हे प्रमाण ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू असे होते.
ज्वारी का बंद झाली?
जिल्ह्यात हमीभावाने खरेदी केलेली ज्वारी संपल्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे गहू व तांदळाचा पुरवठा सुरू झाला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेला गव्हाचा साठा आणि लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन हा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
६ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना फायदा
या नवीन बदलामुळे नाशिक जिल्ह्यातील ‘प्राधान्य’ व ‘अंत्योदय’ योजनेतील सुमारे ६ लाख ७६ हजारांहून अधिक पात्र लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. गव्हाचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.



