कावळ्यांचा सहचर : नांदगावचा अशोक
वेगवान मराठीः मारूती जगधने
दिनांक . [31 ऑगस्ट 2025 ]
नांदगावच्या रेल्वे च्या भुयारी मार्गाच्या बाजुला जुने रेल्वे फाटक रस्त्याच्या कडेला येवला रोडवर रोज बसणारा अशोक हा सर्वसामान्यांना “भिकारी” वाटेल, पण त्याची ओळख थोडी वेगळी आहे. अंगावर साधेपणा, हातात मोजके मुरमुरे… आणि सोबतीला डझनभर कावळे.
भूक भागवताना तो स्वतः काही मुरमुरे खातो, तर काही भिंतीवर टाकतो. लगेच कावळे जमले की तोही त्यांच्यासोबत एक अदृश्य नातं जोडतो. स्थानिकांच्या दृष्टीने हे दृश्य केवळ वेगळं नाही तर अद्भुत आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा परिसरात श्राद्धकर्म किंवा दशक्रिया विधी होत असतात आणि कावळे नैवेद्य स्वीकारायला येत नाहीत, तेव्हा लोक अशोककडे धाव घेतात. त्याने टाकलेल्या मुरमुर्यांनी कावळे येतात आणि विधी निर्विघ्न पार पडतो. या एका कृतीमुळे तो अनेकांच्या श्रद्धेला हातभार लावतो.
विचार करण्यासारखं…
समाज अशोककडे “भिकारी” म्हणून पाहतो. पण खरी गोष्ट अशी आहे की, आपल्या लहानशा कृतीमुळे तो समाजाच्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धा टिकवतो. साध्या जगण्यात समाधानी राहूनही तो इतरांसाठी महत्त्वाचा ठरतो.
आजच्या धकाधकीच्या, स्वार्थी जगात अशोकसारख्या व्यक्ती आपल्याला सांगतात –
माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवर किंवा पैशावर होत नाही; किंमत होते ती त्याच्या मनाच्या साधेपणावर आणि इतरांना उपयोगी पडणाऱ्या छोट्याशा कृतीवर.



