जिवंतपणी संघर्ष, मृत्यूनंतरही हेळसांड; रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२४ ऑगस्ट २०२५ :- कोळगाव ता.निफाड येथील स्व.प्रकाश दत्तात्रय घोटेकर (वय ३९) यांचे दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजता दुर्दैवी निधन झाले. मात्र स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उपलब्ध नसल्याने अंत्ययात्रा रखडली व मृतदेह १४ तास घरातच ठेवावा लागला. त्यामुळे रस्त्यासाठी जिवंतपणी संघर्ष… मृत्यूनंतरही हेळसांड!’ अशा शब्दांत कोळगावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला.
स्व.प्रकाश यांच्या निधनानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाली; पण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने रात्री चिखल तुडवत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेह घरातच ठेवावा लागला. जवळपास सकाळी १२ वाजेपर्यंत नातेवाईक व ग्रामस्थ अंत्ययात्रेच्या प्रतीक्षेत होते. अखेर ग्रामस्थांनी ठरवून ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी १ वाजता गोदावरी नदीकाठी अंत्यविधी पार पाडण्यात आला. या घटनेमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर होतेच; पण मनात प्रशासनाविषयी रोषही होता.
देवगाव ते कोळगाव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे निदान खडीकरण व्हावे अशी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे. या रस्त्यासाठी मागील महिन्यात गावातील तरुण, महिला व शालेय विद्यार्थी यांनी एकत्र येत साखळी उपोषण केले होते. रस्ता मंजूर व्हावा यासाठी मोठा आवाज उठवण्यात आला होता. तरीदेखील अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा उपाययोजना झालेली नाही.
या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. ‘आज अंत्ययात्रा रखडली, उद्या आणखी कोणते संकट येईल सांगता येत नाही. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा गावकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्त्याअभावी जिवंतपणी संघर्ष आणि मृत्यूनंतरही अपमान… असा प्रसंग फक्त आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातच का घडतो? लोकप्रतिनिधींच्या येवला – लासलगाव मतदारसंघातील दुर्लक्षाचे भोग आम्हाला किती काळ भोगावे लागणार?
दत्तात्रय घोटेकर



