देवळ्यात मका लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन; मका आणि कांद्याला ‘कवडीमोल’ भाव, तीव्र असंतोष

देवळा : मक्याची शासकीय हमी भावाने खरेदी तात्काळ सुरू करावी आणि कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावावर अनुदान द्यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार, (ता. २४) रोजी देवळा बाजार समितीतील मक्याचे लिलाव बंद पाडले आणि देवळा-कळवण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असलेला तीव्र असंतोष या आंदोलनातून व्यक्त झाला.
शिवसेना (उबाठा गट) आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादन केलेला मका बाजारात केवळ १,३०० ते १,६०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकला जात आहे, तर केंद्र सरकारने मक्यासाठी २,४०० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनने अद्याप शासकीय भावाने खरेदी सुरू केली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याचीही हीच स्थिती आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील शेतकरी एकत्र आले आणि बाजारभाव जाणून घेतल्यानंतर त्यांनी बाजार समितीतील मक्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी युती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर देवळा-कळवण रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे जवळपास एक तासभर वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाच्या वेळी निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांना निवेदन सादर करण्यात आले.
- महाराष्ट्र शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनने जाहीर केलेल्या शासकीय भावाने मक्याची खरेदी येत्या चार दिवसांत सुरू करावी.
- कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावावर तातडीने अनुदान जाहीर करावे.
यावेळी शिवसेना (उबाठा गट)चे तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. तसेच, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास अहिरे, सामाजिक कार्यकर्ते विनोद आहेर आणि प्रहार शेतकरी संघटनेचे उमेश आहेर यांनीही आपला निषेध नोंदवला.
शासकीय खरेदी तात्काळ सुरू न झाल्यास, देवळा येथील पाच कंदिल चौकात रास्ता रोको करून आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उबाठा गट), शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



