नैसर्गिक आपत्तीचा तडाखा : २४११८ हेक्टर वरील पिकांचे नुकसान,१५५गावांतील ३४हजारांहुन जास्त शेतकरी बाधित

बागलाणमध्ये नैसर्गिक आपत्तीचा तडाखा : २४११८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, १५५ गावांतील ३४ हजारांहून अधिक शेतकरी बाधित
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.30सप्टेंबर 2025 :-
बागलाण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील १५५ गावांतील तब्बल ३४,७२० शेतकऱ्यांचे अंदाजे २४,११८ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या जोरदार पावसामुळे मका, बाजरी, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, केळी यासारखी उभी पिके पूर्णपणे जमिनीवर लोळवळली आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचे कांदा चाळीवरील पत्रेही उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांची पडझड, जनावरांची शेड उडून जाणे, तसेच शेतीमालाचे नुकसान यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः पोल्ट्री व्यवसायिकांचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
शासनाने तातडीने मदत करावी
या पार्श्वभूमीवर बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने व भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन तात्काळ मदत जाहीर करावी,” असे अहिरे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींची पाहणी, प्रशासन सक्रिय
आमदार दिलीप बोरसे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी भैय्यासाहेब सावंत, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



