नाशिक ग्रामीण

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी देवगाव हादरले; सहावा बिबट्या जेरबंद ; देवगाव ‘बिबट आपत्तीप्रवण क्षेत्र’ घोषित करण्याची मागणी; बिबट्याला चार तास रोखले

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१४ जाने २०२६ :- निफाड पूर्व भागातील देवगाव परिसरात बिबट्यांनी उच्छाद मांडला असून आजपर्यंत नऊ नागरिकांना हल्ला करत जखमी केले आहे. परिसरात ६३ दिवसांत सहावा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. हा परिसर ‘बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यासाठी संतप्त नागरिकांनी वनविभागाची गाडी चार तास रोखून धरली.
देवगाव परिसरातील वाकद, शिरवाडे, कानळद, रुई, मानोरी, महादेवनगर, धानोरे, कोळगाव या गावांत बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच बुधवार
दि.१४ जानेवारी रोजी पहाटे येथील किशोर दत्तु बोचरे यांच्या गट नंबर ८०/२ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे सहा वर्षे वयाचा नर बिबटया जेरबंद झाला. परिसरात दोन किलोमीटरच्याच परिघात अवघ्या ६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद झाला आहे. याबाबत नागरिकांना कळले असता, संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, बिबट्याच्या प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित करा अशी मागणी करत चार तास पिंजरा रोखून धरला. घटनेची माहिती कळताच येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, निफाडचे आधुनिक पथक सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मागणीस सकारात्मकता दाखवत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी ग्रामस्थांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदर बिबट्याला म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात हलविण्यात आले.
यावेळी उपसरपंच लहानु मेमाणे, मनोहर बोचरे, किशोर बोचरे, भागवत बोचरे, धनजंय जोशी, राजेंद्र मेमाणे, पोलीस पाटील सुनील बोचरे, संदिप बोचरे, नागेश्वर बोचरे, गोपीनाथ मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आतापर्यंत जेरबंद झालेले बिबटे :-

१) दि.१२ नोव्हेंबर २०२५ शरद जोशी, गट क्र. ४८५
२) दि. १७ नोव्हेंबर २०२५ चांगदेव शिंदे, गट क्र. १९१
३) दि. ०४ डिसेंबर २०२५ सुनील बोचरे, गट क्र. ४१४/१
४) दि. २१ डिसेंबर २०२५ लक्ष्मीकांत सुखदेव रोटे, गट क्र. ६०३
५) दि. ०८ जानेवारी २०२६ परशराम कचेश्वर बोचरे, गट क्र. ९६/१

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!