तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य, ना नळाला पाणी, ना निर्जंतूकीकरण..
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य, ना नळाला पाणी, ना निर्जंतूकीकरण..

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला : दिनांक: 7ऑगस्ट 2025
येवला तालुक्यातील शेकडो नागरिक दररोज शासकीय कामांसाठी येवला तहसील कार्यालयात गर्दी करतात. अत्याधुनिक प्रशासकीय संकुलात सर्व शासकीय कार्यालये एकत्र असण्याचा लाभ नागरिकांना होत असला, तरी या संकुलातील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था ही चिंतेचा विषय ठरत आहे.
स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी आणि हात धुण्यासाठी पाण्याचा अभाव यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर असून, स्वच्छ भारत अभियान आणि प्रशासनाची जबाबदारी या दोहोंवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षांत येवल्यात विविध शासकीय इमारती उभारण्यात आल्या. कृषी विभाग, प्रांत, तहसील, सहाय्यक निबंधक, पंचायत समिती, नगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अशा अनेक विभागांची कार्यालये एकाच संकुलात आल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परंतु स्वच्छतागृह व कार्यालयीन सेवांचा बोजवारा
तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे की:
कार्यालयीन कामे वेळेवर होत नाहीत.
एकाच कामासाठी अनेकवेळा चकरा माराव्या लागतात.
काही कर्मचाऱ्यांचा असंवेदनशील वर्तनामुळे त्रास वाढतो.
आणि सर्वात महत्त्वाचे – सार्वजनिक स्वच्छतागृह पूर्णपणे अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि पाण्याविना आहे.
जबाबदार प्रशासनाची गरज
येवला तहसील कार्यालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या भव्य इमारतींचे उद्दिष्ट फक्त सौंदर्य नसून, सेवा व सुविधा सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. तहसील कार्यालयीन गोंधळ, गैरसोयी व दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांची जबाबदारी स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करावी, हीच सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.



