कऱ्हे शिवारात दहशत निर्माण केलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद, वनविभागाची कामगिरी

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.६ऑगस्ट२०२५:- बागलाण तालुक्यातील क-हे गावाजवळील कामपीरबाबा डोंगर परिसरात आपल्या दशहतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने मंगळवार (दि.५)रोजी रात्री यशस्वीरित्या जेरबंद केले. पोलीस पाटील चंद्रसिंग सोळंकी यांच्या मळ्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.
या परिसरात दोन बिबट्यांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती. या बिबट्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्या, मेंढ्या, गाई, कोंबड्या, कुत्रे यांसह अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता. त्यात गणसिंग जाधव, दिनेश जाधव, बाळासाहेब देवरे, अर्जुनसिंग जाधव, रविंद्र जाधव, सतीष सोळंके, संजय सोळंके या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
विशेष म्हणजे एका पोल्ट्री फार्मवरील शेकडो कोंबड्या बिबट्याने फस्त केल्याने शेतीसह पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी वेळोवेळी वनविभागाकडे तक्रारी करूनही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र नुकत्याच झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर वनविभागाला जाग येऊन हालचाल करावी लागली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागील दोन दिवसांपासून परिसरात पिंजरा लावण्यात आला होता .आणि अखेर मंगळवारी रात्री या बिबट्याला त्या पिंजऱ्यात अडकवण्यात यश आले. या मोहिमेत वनपाल पी. ए. गुंजाळ व स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, अजूनही परिसरात एक बिबट्या व त्याची तीन पिल्ले असल्याची माहिती समोर येत असून नागरिक व शेतकरी अजूनही भयग्रस्त आहेत. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी दिनेश जाधव यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



