“बेपत्ता पल्लवी चा मृतदेह विहिरीत सापडला ; आत्महत्येची नोंद, तपास सुरू”

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा तालुक्यातील खडकतळे येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली पल्लवी समाधान पगार (वय १४ वर्ष) हिचा मृतदेह शनिवार दि. ९ रोजी दुपारी १ वाजता घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खडकतळे येथील पल्लवी पगार हि गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. परंतु ती घरी परत न आल्याने तिचे कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला, परंतु तिचा तपास लागत नसल्यामुळे अखेर देवळा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दि.९ रोजी दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पल्लवीच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय तिचे शव ताब्यात घेणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली होती, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते आदींनी नातेवाईकांची समजूत काढून पोलिस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पल्लवीचे शव ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर खडकतळे येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना पल्लविची सुसाईड नोट प्राप्त झाली असून त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.



