शेती

शेतकरी मारहाण, अपहरण व धमकीप्रकरणी ‘मिटले’ असा परस्पर अहवाल पाठविणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीस जिल्हा उपनिबंधकांची फेर नोटिस

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.३ ऑक्टो २०२५ :- पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी चांदवड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या शेतकऱ्यांना केलेल्या मारहाण, अपहरण व दमबाजी प्रकरणी जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी बाजार समितीस नोटिसा काढल्या आहेत.
दि.१ सप्टेंबर रोजी वडगाव पंगू ता.चांदवड येथील ऋषिकेश संपत गोजरे या तरुण शेतकऱ्याला झालेल्या मारहाण व अपहरण प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीस नोटीस पाठवली होती. याबाबत बाजार समितीने अपहरण व मारहाण झालेल्या शेतकऱ्याची बाजू ऐकून न घेता व्यापाऱ्याची बाजू घेत प्रकरण आपआपसात मिटले असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास पाठवला. याबाबत संबधित तक्रारदाराने माघार घेतलेल्या शेतकऱ्यांचा व अपहृत शेतकऱ्याचा काही संबंध नसल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीस फेर नोटीस काढली आहे.
दरम्यान दि.१५ सप्टें रोजी चांदवड तालुक्यातीलच पिंपळद येथील शेतकऱ्यास मारहाण झाल्याची दुसरी घटना उघड झाली आहे. याबाबत संबंधित शेतकरी दशरथ बाजीराव ठोंबरे यांनीही जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार केली आहे. दशरथ ठोंबरे दि.१५ सप्टें रोजी याच बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आले होते. पहिल्या व्यवहारात व्यापाऱ्याने २२१ रुपये दराने खरेदी केलेल्या क्रेटमागे ५० रुपये दर कपात केली. त्यामुळे ठोंबरे यांनी तो माल व्यापाऱ्यास न देता परत बाजार समितीत नेला. दुसऱ्या व्यापाऱ्याने १८५ रुपयांचा भाव सांगितला, मात्र त्यानेही ३० रुपये भाव कमी केला. तिसऱ्यांदा सर्वज्ञ फूड अँड व्हेजिटेबल कंपनी आडत मधील खरेदीदार राजकुमार चिढावा यांनी १५५ रुपये दराने खरेदी केली. गाळ्यावर गेल्यानंतर शेतकऱ्याला जवळपास एक तास थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर १० क्रेट खाली ओतल्यानंतर दर कमी करण्याची अट घालण्यात आली. यावेळी शेतकऱ्याने ‘ठरलेल्या भावानेच माल उतरवावा’ असा आग्रह धरताच संबंधित व्यापारी अंगावर धावून आला. ‘येथून निघून जा, नाहीतर महागात पडेल’ अशा हिंदी भाषेत धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. त्याचवेळी गाळ्यातील २० ते २४ परप्रांतीय मजूर शेतकऱ्याभोवती जमा झाले. त्यामुळे तो पूर्णपणे भयभीत झाला. शेतकऱ्याबरोबर असलेल्या गाडी मालक शेतकऱ्यालाही शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली. ठोंबरे यांनी तत्काळ बाजार समितीचे सभापती दिलीप काका बनकर यांना फोन लावला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर पत्रकार गिरीश बिडवाई व रावसाहेब उगले यांना सर्व प्रकार फोनवरून सांगितला. अखेर सर्वज्ञ फूड कंपनीचे आडतदार प्रतिनिधी तिथे आल्यावर गाडी खाली करण्यात आली आणि पावती देण्यात आली. या संपूर्ण प्रकाराला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वेळ लागला. या घटनेमुळे तरुण शेतकरी भयभीत झाले असून, बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशी तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. संबंधित अर्जाच्या आधारे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ व नियम १९६७ तसेच समितीच्या उपविधीनुसार चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी नोटीस उपनिबंधकांनी बाजार समितीस बजावली आहे.

या केवळ महिनाभरात या बाजार समितीत चार ते पाच शेतकऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणाची बाजार समितीने कुठल्याही तक्रारीची वाट न पाहता तातडीने दखल घेणे गरजेचे असतांना त्यांनी मारकुट्या व्यापाऱ्याची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने बाजार समिती ही शेतकऱ्यांची कि व्यापाऱ्यांची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!