नाशिक ग्रामीण

सिन्नर: माळेगांव एमआयडीसीत साडे सहा लाखांचा रेक्टिफाइड स्पिरिट साठा जप्त…

शरद शेळके, वेगवान नाशिक 

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत मद्यनिर्मितीसाठी लागणारा रेक्टिफाइड स्पिरिट साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने गुरुवारी (दि.१) पहाटे केलेल्या कारवाईत रेक्टिफाइड स्पिरिटचा अवैध साठा पकडत तब्बल ६ लाख ४९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माळेगाव एमआयडीसीतील प्लॉट नंबर डी- ७१ मधील सुविधी इंडस्ट्रीज या कारखान्याच्या आवारात मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या रेक्टिफाइड स्पिरिटचा साठा असल्याची गुप्त माहिती मुंबईतील उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.या कारवाईत कारखान्याच्या पत्र्याच्या गाळ्यातून स्पिरिटने भरलेले प्लास्टिक ड्रम, बॉटलिंगसाठी लागणारे साहित्य तसेच एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. कारवाईची चाहूल लागताच कंपनीचा मालक फरार झाला असून त्याचा शोध उत्पादन शुल्क विभागाच्या सिन्नर पथकाकडून सुरू आहे.

 

साठा केल्यानंतर काही तासांतच कारवाई

बाजूच्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जप्त केलेला स्पिरिटचा साठा आदल्या दिवशीच आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या स्पिरिटपासून जागेवरच मद्यनिर्मिती होणार होती की तो साठा अन्यत्र पाठवण्यात येणार होता, याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक शैलेंद्र मराठे यांनी दिली.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!