विकासाच्या वाटेवरचे खड्डे : या तालुक्यातील महामार्ग प्रवाशांसाठी खड्ड्यांचा सापळा
Nandgaon vaijapur boundary news
विकासाच्या वाटेवरचे खड्डे : या तालुक्यातील महामार्ग प्रवाशांसाठी खड्ड्यांचा सापळा
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दि . 22 सप्टेंबर 2025 ] राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या तीन माकडांची म्हण – वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही आणि वाईट बोलायचं नाही – आता नांदगाव तालुक्यातील रस्त्यांना अगदी तंतोतंत लागू होते. कारण इथले रस्ते एवढे निकृष्ट झालेत की, ते बघायलाही नकोत, त्यावर बोलून काही उपयोग नाही आणि शेवटी नागरिकांना फक्त दुसरा रस्ता धरावा लागतो.
नांदगाव व वैजापूर तालुक्यातील कासारी ते शिऊर बंगला या सुमारे 40 किलोमीटरच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था तर अक्षरशः दैनीय झाली आहे. दोन, तीन नव्हे तर पाच ते सात फूट खोल खड्ड्यांनी बनलेला हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. प्रवाशांची अवस्था अशी झाली आहे की रस्त्यावरचा खड्डा पाहून ते कपाळावर हात मारून घेतात.
शासन व प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. लोकांचा सवाल आहे –
“अपघातात किती जणांनी बळी जावा लागतो, तेव्हा प्रशासनाला जाग येणार? टोल आणि कर वसूल करायला सरकार पुढे असते, पण सुरक्षित रस्ता द्यायची जबाबदारी कोणाची?”
दोन्ही मार्ग ठप्प, तिसऱ्याचीही दुर्दशा
या निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांना 30 किलोमीटरचा फेरा मारून बोलठाण मार्गे छत्रपती संभाजीनगर गाठावं लागतं. पण या मार्गाचीही अवस्था वेगळी नाही. बोलठाण मार्गावरही खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहन बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
काही वाहनचालक आता कासारी – कुसुम तेल – जातेगाव मार्गे बोलठाण किंवा कन्नड मार्गे प्रवास करत आहेत. तरीदेखील या मार्गांचीही अवस्था बिकटच आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिक, वाहनधारक आणि दुचाकीस्वारांचे अक्षरशः हाल होत आहेत.
पावसामुळे परिस्थिती गंभीर
पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. लहानमोठी वाहने खड्ड्यांत अडकून तासन्तास वाहतूक ठप्प राहते. दुचाकीस्वारांची तर परिस्थिती कल्पनेपलीकडे आहे. घरचे लोक प्रवासाला गेलेल्या सदस्याच्या सुरक्षित परतीसाठी अक्षरशः धडधडत्या हृदयाने वाट पाहतात.
आंदोलने होतात पण निष्कर्ष नाही
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलनेही केली. मात्र एखाद्या व्यक्तीच्या वादग्रस्त वक्तव्यावर रस्त्यावर उतरलेले राजकीय पक्ष आणि संघटना या बिकट रस्त्यांच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही.
“विकासाच्या वाटेवरचे खड्डे”
सध्या नांदगाव – शिऊर बंगला, बोलठाण मार्ग आणि पर्यायाने घेतले जाणारे रस्ते – दोन ही मार्गांची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांना आता नांदगाव – येवला – वैजापूर – गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर गाठण्यासाठी 40 ते 50 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
खड्डेच खड्डे, अपघातांची मालिका, वाहतुकीची सततची कोंडी – हीच खरी विकासाच्या वाटेवरची वस्तुस्थिती आहे.
नागरिकांचा संताप आता एवढा वाढला आहे की लोकं उपहासाने म्हणू लागले आहेत –
“विकासाच्या वाटेवर खड्ड्यांना पाचवीचा नैवेद्य चढवायची वेळ आली की काय?”



