
वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 6 ऑक्टोबर 2025
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. संदीप लीलाबाई वसंतराव फरताळे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ‘बी दि चेंज फाउंडेशन’ आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात शिर्डी येथे प्रदान करण्यात आला. राज्यभरातील निवडक शिक्षकांचा सन्मान करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल जपे, स्वरूप कापे, निखिल वामन, दीपक चव्हाण यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे आणि विश्वस्त अभिषेक तुपे उपस्थित होते.
🔹 शिक्षणातून प्रेरणा – शेतकऱ्याच्या मुलाचा प्रवास
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा. संदीप फरताळे यांनी शेतीची कामे करतच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. जिद्द, मेहनत आणि संशोधनाभिमुख विचार यांच्या बळावर त्यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
त्यांनी सादर केलेली “वाहनांचे ब्रेक बटनावर!” ही अभिनव संशोधन कल्पना ‘आविष्कार – २०१५’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाने निवडली गेली. या प्रकल्पासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटकडून दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळाले.
सध्या ते संजिवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोपरगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून यंत्र अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. संशोधन करत आहेत.
🔹 शिक्षक आणि संशोधक दोन्ही भूमिका समर्थपणे
त्यांच्या “वाहनांचे ब्रेक बटनावर” या संशोधनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची आवड निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.
🔹 प्रतिक्रिया
“आजवर केलेल्या कार्याची पावती म्हणून या पुरस्काराकडे मी बघतो. हा सन्मान पुढील शैक्षणिक कार्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”
— प्रा. संदीप फरताळे, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते
🔹 येवला तालुक्याचा अभिमान
प्रा. फरताळे यांच्या या यशाबद्दल येवला तालुक्यातील विविध मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरून शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर झळकलेले हे नाव आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.



