अमेरिकेच्या शुल्कवाढीचा फटका; ब्राझीलच्या द्राक्ष निर्यातीत ७० टक्क्यांची घसरण

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ : – अमेरिकेने आयात करात (Tariff) केलेल्या वाढीचा थेट फटका ब्राझीलच्या द्राक्ष निर्यातदारांना बसला असून, अमेरिकेला होणारी द्राक्षांची निर्यात तब्बल ७० टक्क्यांनी कोसळली आहे. २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत झालेली ही घसरण मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत अत्यंत मोठी मानली जात आहे.
आकडेवारीनुसार, निर्यातीत झालेल्या या घटीमुळे महसूलातही २२ टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकेकाळी ब्राझीलच्या एकूण द्राक्ष निर्यातीत अमेरिकेचा वाटा तब्बल ३८ टक्क्यांपर्यंत होता. मात्र शुल्कवाढीनंतर हा वाटा केवळ ४ टक्क्यांवर आला आहे.
निर्यात घटल्यामुळे ब्राझील सरकार आणि उत्पादक कंपन्यांना पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागला. परिणामी, देशाने आर्जेन्टिना, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स तसेच इतर लॅटिन अमेरिकन देशांकडे द्राक्षांचा पुरवठा वळवला आहे. सध्या या नव्या बाजारपेठांमध्ये आर्जेन्टिनाचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक इतका वाढला आहे.
तथापि, अमेरिकेच्या तुलनेत या देशांमध्ये दर तुलनेने कमी असल्याने उत्पादकांचे आर्थिक नुकसान भरून निघाले नाही. ब्राझीलमधील काही प्रांतांमध्ये स्थानिक बाजारात द्राक्षांचा पुरवठा नियंत्रित ठेवण्यात आला असला, तरी उत्पादन खर्च आणि निर्यात दरातील फरकामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
स्थानिक निर्यात संघटनांनी अमेरिकन प्रशासनाने लावलेल्या आयात करांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. तर कृषी विश्लेषकांच्या मते, सध्याची स्थिती कायम राहिल्यास येत्या हंगामात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
reference amicus



