दोन तासात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या व्हिडिओची दखल ; तहसिलदार व पोलिसांच्या तत्परतेमुळे पंधरा वर्षांचा शेतरस्त्याचा वाद अखेर शांततेत मिटला

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद :- दिनांक २८ जानेवारी रोजी दोन तासात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या व्हिडिओची दखल घेत, धानोरे (ता. निफाड) येथील गट क्रमांक १२४ मधील शेतजमिनीचा पंधरा वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर तहसिलदार व पोलिसांची तत्परता व समन्वयात्मक हस्तक्षेपामुळे शांततेत निकाली निघाला.
येथील दत्तात्रय संपत तासकर या युवकाने व्हिडिओद्वारे आपली कैफियत मांडत प्रश्न तात्काळ निकाली न निघाल्यास दोन तासात विहिरीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. सदर व्हिडिओमध्ये माझ्या शेतजमिनीच्या बांध व वहिवाटी रस्त्यावरून गेल्या पंधरा वर्षांपासून वाद सुरू आहे. आम्ही चाळीस वर्षांपासून वापरत असलेला वहिवाटी
रस्ता प्रतिवादी चुलत भाऊ व त्याचे कुटुंबियांनी गेल्या दोन महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे माझी शेती पडीक पडली आहे. मी यापूर्वी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असूनही प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. तसेच महसूल कार्यालयात अर्ज करूनही मला संबंधित अधिकाऱ्यांची भेट मिळाली नाही. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही प्रतिवादी हस्तक्षेप, अडवणूक व धमक्या देत आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रतिवादींनी मला मारहाण केली तसेच माझ्या अडीच महिन्यांच्या गरोदर पत्नीला लाथा – बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने गर्भपात झाला. सामायिक विहिरीचे पाणी प्रतिवादी एकतर्फी वापरत असून तीन वर्षांपासून माझ्या शेतीला पाणी नाही. त्यामुळे आजवर अंदाजे २५ ते ३० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वहिवाटी रस्ता तात्काळ खुला करून संरक्षण द्यावे, सामायिक विहिरीच्या वापराबाबत न्याय द्यावा, प्रतिवादींवर मागील झालेल्या कारवाईत जामीनदार झालेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, मी व माझे कुटुंब दहशतीत जीवन जगत आहोत, त्यामुळे माझ्या व कुटुंबाच्या जीवितास संरक्षण द्यावे, मी मानसिक तणावात असून मला न्याय न मिळाल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला होता. हा व्हिडिओ सप्तशृंगगड येथील पत्रकार सोमनाथ मानकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पत्रकार किरण आवारे यांना
व त्यांनी सदर व्हिडिओ धानोरे येथील पोलीस पाटील अरुण गुजर यांच्याकडे पाठवून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर पोलिस पाटील गुजर यांनी तात्काळ हालचाली करत लासलगाव पोलीस ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांना प्रकरणाची माहिती दिली. भास्करराव शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस हवालदार डी.डी.जाधव व सागर आरोटे यांचेसह तातडीने धानोरे येथे भेट देऊन दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र, हे प्रकरण महसुली स्वरूपाचे असल्याने स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी समन्वय साधत मार्गदर्शन घेतले. तहसिलदार मा. विशाल नाईकवाडे यांच्या सूचनेनुसार ग्राममहसूल अधिकारी शुभम पाटसकर, पोलीस पाटील अरुण गुजर, सागर गायकवाड, ग्रामस्थ, महसूल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत दोन्ही शेतकऱ्यांची सविस्तर बाजू ऐकून घेण्यात आली. प्रशासनाने तब्बल पाच तास वेळ देऊन कायदेशीर चौकटीत आणि शांततेच्या मार्गाने चर्चा करून शेतरस्त्याचा वाद निर्णयपूर्वक मिटवण्यात आला. पुढील कायदेशीर निर्णय येईपर्यंत या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा वादी व प्रतिवादी यांना इशारा देण्यात आल्याने पीडित शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली बाब लक्षात घेता महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने समन्वय साधून दोन्ही पक्षांची सविस्तर बाजू ऐकून घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून, शांततेच्या मार्गाने शेतरस्त्याचा वाद तात्पुरता निकाली काढण्यात आला असून पुढील कायदेशीर निर्णय होईपर्यंत कुणीही हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मा.विशाल नाईकवाडे
तहसिलदार, निफाडआत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ अत्यंत गंभीर होता. मानवी दृष्टिकोनातून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती जाणून घेतली. हे प्रकरण महसुली स्वरूपाचे असल्याने तहसीलदारांशी समन्वय साधून शांततेने तोडगा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून कोणताही दबाव, धमकी किंवा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
भास्करराव शिंदे
ठाणे प्रभारी, लासलगाव



