वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा आणि चांदवड तालुक्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कंबर कसली आहे. ‘आमदार आपल्या गावी’ या त्यांच्या संकल्पनेतून ‘जलसमृद्धी अभियान’ त्यांनी हाती घेतले असून, या अभियानाचा शुभारंभ देवळा तालुक्यात गुरुवार दि. ८ जानेवारी सकाळी १० वा. तहसील कार्यालय देवळा येथून तसेच चांदवड तालुक्यात शुक्रवार दि. ९ जानेवारी दुपारी १२:०० वा. तहसील कार्यालय चांदवड येथून होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मंगळवारी (दि. ६) पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस भाजप तालुकाध्यक्ष किशोर आहेर, माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे, मविप्र माजी संचालक प्रमोद पाटील, हे उपस्थित होते.
मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तरच खऱ्या अर्थाने विकास होईल, या भावनेतून हे अभियान राबवले जात आहे. या दौऱ्यात आ. डॉ. आहेर स्वतः गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार कुठे पाटचारीची गरज आहे, तर कुठे बंधारे दुरुस्तीची, याचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.
या कामांवर राहणार प्रामुख्याने भर
- पुनरुज्जीवन: पाझर तलाव व ब्रिटिशकालीन नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे.
- नवीन प्रकल्प: आवश्यकतेनुसार नवीन वळण बंधारे व साठवण बंधारे बांधणे.
- पाणी वळण योजना: प्रवाही व पावसाचे पाणी अडवून टंचाईग्रस्त भागाकडे वळवणे.
- सिंचन विस्तार: उपसा जलसिंचन (लिफ्ट) योजना आणि कालव्यांद्वारे सिंचन क्षेत्र वाढवणे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे आ. डॉ. आहेर यांच्यासोबत तापी खोरे विकास महामंडळ, मृद व जलसंधारण, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे समस्यांवर जागीच तांत्रिक चर्चा होऊन उपाययोजनांना गती मिळणार आहे. नारपार योजनेअंतर्गत मंजूर होत असलेल्या कामांचा लाभ शेवटच्या टोकापर्यंत कसा पोहोचवता येईल, यावरही चर्चा होणार आहे.
“देवळा आणि चांदवड तालुक्यातील पाणीप्रश्न हा माझ्यासाठी केवळ राजकारणाचा भाग नसून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला, तरच माझ्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. ‘दुष्काळी तालुका’ ही ओळख पुसून दोन्ही तालुके पूर्णपणे ‘पाणीदार’ करण्याचा माझा ठाम मानस आहे. याच उद्देशाने मी ‘जलसमृद्धी अभियान’ हाती घेतले असून, या पंचवार्षिकमध्ये पाण्याचे नियोजन करण्यावरच माझा सर्वाधिक भर असेल. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांसह आपल्या गावात येत आहे. ग्रामस्थांनी, सरपंचांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या भागातील पाण्याच्या समस्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबद्दल थेट संवाद साधावा, जेणेकरून आपल्याला ठोस कृती आराखडा तयार करता येऊन यावर काम करता येईल. असे यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, यांनी सांगितले.