रस्त्यात गाडी अडवून लूटप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावास; दुसरा निर्दोष ; निफाडचे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद १३ डिसेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील चाटोरी शिवारात गाडी अडवून चालकाच्या खिशातून ४० हजार रुपयांची लूट केल्याप्रकरणी निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश अब्दुस्सलाम अश्पाक अहमद शेख यांनी एका आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली असून दुसऱ्या आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे.
याबाबत, निफाड पोलीस ठाण्यात नईमुद्दीन सय्यद यांनी दि.१५ सप्टें २०१२ रोजी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, व्यापारी राकेश कुमार व रवी कुमार सिंग यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपये घेऊन ते कारने चाटोरी येथे आले होते. दुपारी सुमारे २ वाजता त्यांच्या कारला ओव्हरटेक करून एक मोटारसायकल आडवी उभी करण्यात आली. त्या मोटारसायकलवर दशरथ ऊर्फ गोट्या लहाने व योगेश जेजुरकर हे दोघे होते. यावेळी गोट्या लहाने याने मारहाण करून खिशातील ४० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांचे फिर्यादीवरून
निफाड पोलिसांनी भादंवि कलम ३९४, ३९७, ३४१, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी तपास अधिकारी जी.एन.चौधरी यांच्यासह एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून म.पो.कल्पना पवार यांनी कामकाज पाहिले.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांवरून दशरथ ऊर्फ गोट्या लहाने यांस दोषी ठरवून भा.दं.वि कलम ३४१ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास) तसेच भा.दं.वि कलम ३९२ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व ५०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ४ महिने साधा कारावास) अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर योगेश जेजुरकर यास निर्दोष मुक्त करण्यात आले.



